
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि जगभरातील लोकांपर्यंत पोचेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर खाद्यपदार्थांचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात असतो. या ट्रेंडमध्ये लोक वाहवत जातात आणि ते पदार्थ खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये पोचतात. या अशाच ट्रेंडमुळे सध्या जगभरातील मार्केटमध्ये वस्तूंची टंचाई जाणवत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, ‘दुबई चॉकलेट’चा ट्रेंड गेल्या वर्षभरापासून टिकटॉकवर आहे. परिणामी दुबई चॉकलेटची जोरदार विक्री होतेय. यामुळे जगभरातील मार्केटमध्ये पिस्त्याची टंचाई निर्माण झाली आहे. दुबई चॉकलेट 2021 साली बुटीक अमिराती चॉकलेट फिक्स या नावांतर्गत लाँच करण्यात आले. मिल्क चॉकलेट, कटैफी पेस्ट्री, पिस्ता क्रिम यापासून दुबई चॉकलेट तयार करण्यात येते. 2023 मध्ये टिकटॉकवर दुबई चॉकलेटवर व्हिडीयो करण्यात आला. हा व्हिडीयो तुफान व्हायरल झाला. आतापर्यंत सुमारे 12 कोटी लोकांनी तरी व्हिडीयो पाहिला असेल. तेव्हापासून या पिस्ता चॉकलेटसाठी जगभरात क्रेझ दिसून येतेय. त्यामुळे पिस्ताची मागणी आणि किंमतही वाढली आहे.
- एका वर्षात पिस्ताची किंमत 7.65 पाऊंडपेक्षा अधिक झालेय. पिस्ता टंचाईमुळे अस्सल दुबई चॉकलेट तयार करण्यावरही मर्यादा आलेय. दुबई चॉकलेटच्या नावाने डमी चॉकलेट मार्केटमध्ये आणण्याचे प्रकार घडत आहेत. इराण हा पिस्त्याचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. टिकटॉकवर दुबई चॉकलेटचा ट्रेंड आल्यानंतर इराणने 40 टक्के निर्यात केली आहे.
जपानी चहाला मागणी
जपानची ‘माचा टी’ जगभरात ट्रेंडिंगमध्ये आलेय. जगभरात जपानी चहाची मागणी वाढलेय. केवळ स्वादासाठी नव्हे तर आरोग्यासाठी ‘माचा टी’ला जगभरात मोठी मागणी आहे. ही एकप्रकारची ग्रीन टी आहे. चहापत्तीला कुटून तिची पावडर करून ‘माचा टी’ तयार केली जाते. या ग्रीन टी पावडरला प्रचंड मागणी आहे. मागणी तसा पुरवठा करण्यात जपानने हात टेकलेत. जगभरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ‘माचा टी’चा पुरवठा करणे जपानला शक्य होत नाहीय. त्यामुळे कदाचित या चहाची किंमत वाढण्याची शक्यता आहे.