रुग्णसेवा करत असतानाच वृद्धाश्रम, तुरुंग, अंध विद्यार्थी, अनाथ, निराधार मुले, वेश्यावस्तीतील शाळांसाठी शिबिरे आयोजित करून वंचित आणि उपेक्षित घटकांना सेवा दिली जात असल्याबद्दल नायर दंत रुग्णालयाला अमेरिकेच्या ‘पिएर फॉचर्ड अॅपॅडमी’ने पुरस्कार देऊन सन्मानित केले. ‘आशिया पॅसिफिक देशांतील सर्वोत्तम सामाजिक सेवा’ या श्रेणीतील हा पुरस्कार आहे. नवी दिल्ली येथे अॅपॅडमीच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेरील बिलिंगस्ले यांच्या हस्ते नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आधुनिक दंतशास्त्राचे जनक मानले जाणारे फ्रेंच दंतचिकित्सक पिएरी फॉचर्ड यांच्या स्मरणार्थ आणि विविध क्षेत्रांतील योगदानासाठी या अॅपॅडमीच्या वतीने पुरस्कार दिले जातात. दरम्यान, येत्या काळात आणखी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांना सेवा देण्यासाठीची नायर रुग्णालय दंत महाविद्यालयालाची जबाबदार वाढली आहे, असे मत अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केले.
साडेतीन लाख रुग्णांवर होतो उपचार
मुंबई सेंट्रल येथील मुंबई महापालिका संचालित नायर रुग्णालय दंत महाविद्यालय हे सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी दुसऱया क्रमांकाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयाची स्थापना 1933 मध्ये झाली होती. रुग्णालयात दरदिवशी सरासरी 1 हजार ते 1200 रुग्ण मौखिक आरोग्याशी संबंधित उपचारासाठी येतात तर वार्षिक सरासरी साडेतीन लाख रुग्ण दंत उपचारासाठी येतात.
वृद्धाश्रम, तुरुंग, अंध विद्यार्थी, अनाथांसाठी शिबिरे
रुग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्य सामाजिक विभागाच्या वतीने विविध ठिकाणी ‘पोर्टेबल डेंटल व्हॅन ऑन व्हील’ संकल्पनेवर आधारित शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये विविध दवाखाने, वृद्धाश्रम, तुरुंग, दृष्टी नसणारे विद्यार्थी, अनाथ आणि निराधार मुले, देहविक्रय करणाऱयांच्या वस्तीतील मुलांच्या शाळा तसेच रोटरी क्लब या ठिकाणी दंत शिबिरांचे आयोजन करण्यात येते.