ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशेंचा हिट अ‍ॅण्ड रनमुळे मृत्यू, मारेकरी शोधण्यासाठी मुलाची फरफट

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुष्पा आगाशे यांचा हिट अ‍ॅण्ड रनमुळे मृत्यू झाल्यानंतर ठाण्यातील सीसीटीव्हीचे जाळे अत्यंत तकलादू असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. सदर घटना उलटून 24 तास झाले तरी आगाशे यांना ठोकर देणाऱ्या वाहनचालकाचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यांचा मुलगा आशीष आगाशे हा आपल्या आईचा मारेकरी शोधण्यासाठी वणवण फिरत असून त्याची फरफट सध्या चालू आहे. दरम्यान घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे असूनही प्रत्यक्ष नेमके काय झाले याची माहिती देण्यास महापालिका व पोलीस यांची ढकलाढकली सुरू आहे.

ठाण्यातील तीनहात नाका परिसरात गुरुवारी सकाळी दूध आणण्यासाठी पायी निघालेल्या 73 वर्षीय पुष्पा आगाशे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान सुरू असताना अपघातानंतर जखमी अवस्थेतील पुष्पा यांना मदत करण्याऐवजी वाहनचालकाने घटनास्थळावरून धूम ठोकल्याने संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य नसल्याने संताप

अद्याप फरार वाहनचालक सापडला नसल्याने आज सकाळपासून आशीष आगाशे यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का याची पाहणी केली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र हे कॅमेरे पालिकेचे की पोलिसांचे याचे उत्तर आशीष आगाशे यांना कोणी देत नाही. आगाशे यांना हाजुरी येथील नियंत्रण कक्षात जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा बघण्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही कुचकामी असल्याचे समोर आले. याप्रकरणी आगाशे यांनी नौपाडा पोलिसांना संपर्क केला असता पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, महापालिका आणि पोलिसांना या घटनेचे गांभीर्य नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नेत्रदानाच्या चळवळीत अग्रेसर

पुष्पा या पती श्रीपाद आगाशे यांच्या समवेत गेली चार दशके नेत्रदानाच्या चळवळीत अग्रेसर होत्या. मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ राबवताना या दाम्पत्याने पदरमोड करून शेकडो व्याख्याने आणि स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शने भरवली. पुष्पा यांच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.