अंजली दमानिया यांनी घेतली जरांगे यांची भेट

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण मनोज जरांगे-पाटील आणि अंजली दमानियांनी उचलून धरले आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व आले आहे.

या भेटीविषयी अंजली दमानिया म्हणाल्या की, दोन-तीन दिवसांपूर्वी एका सभेमध्ये जरांगे-पाटील यांना चक्कर आली होती. त्या वेळी मी भेट घेऊन दादांच्या तब्येतीची विचारपूस करावी, असे ठरवले होते. त्यामुळे आज भेट घेऊन मनोज जरांगे-पाटील यांची विचारपूस केली. सगळ्यात चांगल्या माणसांना भेटायला काही प्रॉब्लेम नसतो, असेही दमानिया म्हणाल्या. या वेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेदेखील उपस्थित होते.

संतोष देशमुख खून प्रकरणाबाबत काही चर्चा झाली का, असा प्रश्न विचारला असता, याला पुढची दिशा कशी द्यायची यावर चर्चा झाली. मला त्या चार्टशीटमध्ये सगळं अर्धवट वाटत आहे. आरोपी सुदर्शन घुलेचे स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आले, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटले. कारण त्यात खुनानंतर पुढे काय झाले, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, तेव्हा कराडशी त्याचे बोलणे झाले की नाही याबाबत चकार शब्दसुद्धा स्टेटमेंटमध्ये लिहिलेला नाही, असे त्या म्हणाल्या.

सहआरोपींमुळे धागेदोरे थेट धनंजय मुंडेंपर्यंत

पोलिसांनी असे अर्धवट स्टेटमेंट का घेतले, मी मागे म्हटलं होतं की, 10 लोक आहेत, त्यांना सहआरोपी करणे गरजेचे होते. व्हिडिओमध्ये राजेश पाटील दिसले, प्रशांत महाजन दिसले, हे असतानासुद्धा या कोणालाच, शिवलिंग मोराळे असो, बालाजी तांदळे, डॉ. वायबसे असो, कोणालाही सहआरोपी केलेले नाही. यांना जर सहआरोपी केले तर याचे धागेदोरे थेट धनंजय मुंडेंपर्यंत जातात, म्हणून हे मुद्दाम केलं गेलं नाही, असा आरोपही दमानिया यांनी केला.