भाज्या, कडधान्ये तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडले असताना आता रोजच्या जीवनात वापरात येणारे साबण, खाद्यतेल, चहा, कॉफी, चॉकलेटपासून बिस्किटापर्यंत सर्व काही महागणार असल्याचे समोर आले आहे. या वस्तूंच्या किमती तब्बल 30 टक्क्यांनी वाढणार आहेत. एफएमसीजी अर्थात फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमती 35 ते 175 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे कारण देत जानेवारी ते मार्चदरम्यान उत्पादनांच्या किमती 30 टक्क्यांनी वाढवण्याचे संकेत पंपन्यांनी दिले आहेत. त्यामुळे 5 ट्रिलीयन इकॉनॉमीचे स्वप्न मोदी सरकारला सर्वसामान्यांचे जगणे महाग करून पूर्ण करायचे आहे का, असा सवाल आता केला जात आहे.
एप्रिल 2024 पासून पाम तेल, नारळ, चहा, कोकोआ आणि कॉफी यांच्या किमती वाढल्या आहेत. नुवामा इन्स्टिटय़ूशनल इक्विटीजने आपल्या अहवालात जानेवारी ते मार्चदरम्यान काही एफएमसीजी पंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार असल्याचे म्हटले आहे. त्यात रोज लागणाऱया गरजेच्या वस्तू महागणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
या कंपन्यांची उत्पादने महाग होणार
हिंदुस्थान युनिलीव्हर, गोदरेज पंज्युमर, डाबर, टाटा पंज्युमर, पारले प्रोडक्ट्स, विप्रो पंज्युमर, मेरिको, नेस्ले आणि अदानी विल्मर यांसारख्या पंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार असल्याचे समोर आले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे.