उमेद – मानवतेची वैश्विक प्रेरणा

>> अनघा सावंत

देह व्यापार, मानव तस्करीच्या बळी महिला आणि बालकांची मुक्तता आणि पुनर्वसन करणारी हिंदुस्थानातील इतरांसाठी प्रेरक व अग्रणी सामाजिक संस्था म्हणजेच नगर येथील ‘स्नेहालय.’ प्रेमाच्या धाग्यांनी बांधलेल्या या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे ‘होम ऑफ लव्ह.’ समाजात आणि या बळी समूहात हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या सन्मानित व स्वयंपूर्ण जगण्याच्या क्षमता विकसित करणे हे संस्थेच्या विविध प्रकल्पांचे प्रमुख ध्येय आहे.

कोणतेही सेवाकार्य हे मूलत संवेदनशील कार्यकर्त्याच्या प्रेरणेतून अंकुरते. नगरमध्ये शालेय जीवनात शिकवणीसाठी लालबत्ती भागातून जाता-येताना आपल्याच वयाच्या अल्पवयीन मुली एका शाळकरी मुलाला दिसल्या. त्याच्या आईच्या आणि आजीच्या वयाच्या महिलादेखील जबरदस्तीने तिथे देह व्यापारात वावरताना दिसल्या. या जागी आपल्या कुटुंबातील कोणी व्यक्ती उभी असेल तर काय वाटेल, या विचाराने त्याचे हृदय पिळवटले. ते होते डॉ. गिरीश कुलकर्णी! त्यांची शालेय जीवनातील ही वेदनाच ‘स्नेहालय’ संस्थेची कार्यप्रेरणा बनली. देह व्यापार, मानव तस्करीच्या बळी महिला आणि बालकांची अवस्था गुलामांसारखी असते. त्यांची मुक्तता आणि पुनर्वसन करणारी हिंदुस्थानातील इतरांसाठी प्रेरक व अग्रणी सामाजिक संस्था म्हणजेच नगर येथील ‘स्नेहालय.’ प्रेमाच्या धाग्यांनी बांधलेल्या या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे ‘होम ऑफ लव्ह.’ गेली 35 वर्षे येथे वंचितांना, अनाथांना सुरक्षित आश्रय, आरोग्य सेवा, समुपदेशन, कायदेशीर मदत, व्यावसायिक रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण अशा दर्जेदार सुविधा स्नेहालय पूर्णत निशुल्क पुरवते. संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा जया मारुती जोगदंड या असून शेवगाव येथील लालबत्ती भागात गेली 25 वर्षे शरीरविक्री महिलांसाठी काम करणाऱया या संघटक आता स्नेहालय संस्थेच्या अध्यक्षा आहेत. स्नेहालयाच्या विश्वस्त मंडळात 14 महिला आहेत. त्यांच्याकडे या संस्थेची धुरा आहे. जया ताई सांगतात की, हिंदुस्थानी समाजातील पुरुष प्रधानता आणि असमानतेचा परिणाम म्हणून महिला आणि बालकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित रहावे लागते. समाजात आणि या बळी समूहात हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या सन्मानित व स्वयंपूर्ण जगण्याच्या क्षमता विकसित करणे हे संस्थेच्या विविध प्रकल्पांचे प्रमुख ध्येय आहे.
संस्थेच्या सचिव डॉ. प्रीती भोंबे म्हणाल्या की, 1989 मध्ये केवळ दोन बालकांपासून सुरू केलेल्या कामाचा विस्तार आज 27 सेवा प्रकल्पांमध्ये झाला आहे. वेश्या व्यवसायात अडकलेल्या महिलांच्या बालकांसाठीचा शैक्षणिक प्रकल्प आणि एचआयव्ही बाधितांसाठी वैद्यकीय उपचार देणारा दुसरा अशा दोन उपक्रमांपासून स्नेहालयाची वाटचाल सुरू झाली. आमचे सर्व प्रकल्प मुख्यत्वे महिला आणि बालकांच्या मदतीसाठी चालविले जातात. आज दोन लाखांपेक्षा अधिक लाभार्थींना आतापर्यंत आम्ही विविध प्रकारे मदत पुरवली आहे. संस्थेचा ‘पुनर्वसन संकुल’ प्रकल्प वेश्या व्यवसाय करणाऱया महिलांची बालके, देह व्यापारातून सोडविलेल्या अल्पवयीन मुली, एचआयव्हीमुळे अनाथ झालेली तसेच एचआयव्ही सहजीवन जगणारी बालके, बालविवाहातून सोडविलेल्या मुली, अल्पवयीन माता यांना निवारा देणारा प्रकल्प आहे. बालभवन (2004) हा नगर आणि छत्रपती संभाजीनगरमधील आठ झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱया बालकांना आणि तरुणांना शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य उपक्रम याद्वारे सामाजिक बदल घडवून आणणारा अनोखा प्रकल्प. स्नेहांकुर दत्तक केंद्र (2004) हे सोडून दिलेल्या आणि कायदेशीर मार्गाने परित्याग केलेल्या बालकांना वैद्यकीय आणि इतर सुविधा प्राप्त करून देणारे तसेच त्यांना दत्तकविधानाच्या प्रक्रियेतून उत्तम कुटुंब मिळवून देणारे शासकीय मान्यता असलेले दत्तकविधान केंद्र आहे. आजवर दोन हजार बालकांचे आणि अकराशे बालमातांचे यशस्वी पुनर्वसन संस्थेने केले आहे.

युवनिर्माण प्रकल्प – संस्थेचे कार्य आणि सामाजिक समस्या जाणून घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी संस्था तरुणांचे स्वागत करते आणि त्यांना सहयोग देते. केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर – आर्थिक अडचणी किंवा एचआयव्हीसह जीवन जगणाऱया व्यक्तींना वैद्यकीय सेवा, शस्त्रक्रिया आणि वृद्धांना काळजी प्रदान करणारा प्रकल्प. स्नेहालय इंग्रजी माध्यमिक शाळा – आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्यामुळे मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये संघर्ष करणाऱया बालकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारा शालेय प्रकल्प. संस्थेने महिला आणि 18 वर्षांवरील मुलींना तात्पुरता किंवा दीर्घकालीन निवारा तसेच सर्व सुविधा एकाच छताखाली देणारा ‘स्नेहाधार’ हा प्रकल्प नगर येथे 2011 मध्ये, तर पुणे येथे 2016 मध्ये सुरू केला. ‘उडान’ हा प्रकल्प बालविवाह रोखण्यासाठी नगर जिह्यात कार्यरत आहे. तसेच ‘मनोयात्री आणि मनोबल’ या प्रकल्पांतर्गत मनोरुग्ण आणि व्यसनाधीन व्यक्तींना मानसिक उपचार-आधार व निवारा देण्यासाठी संस्था कार्य करते.

वेश्या व्यवसाय सोडून नव्याने आयुष्य सुरू करणाऱया आणि एचआयव्हीसह जीवन जगणाऱया लाभार्थीसाठी नवीन स्वावलंबी जगण्याचा पर्याय म्हणजे ‘हिंमतग्राम.’ हा 30 एकरांचा सेंद्रिय शेती प्रकल्प संस्था राबवते. अलीकडे दहा आणि अकरा वर्षांच्या बालमाता संस्थेत येत आहेत. कुटुंबातीलच व्यक्तीकडून त्या गर्भवती असतात. संस्थेसाठी हा काळजीचा विषय असल्याचे ‘स्नेहांकुर’ प्रकल्पाच्या संचालिका डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी सांगितले, स्नेहालय आता केवळ संस्था न राहता ती मानवतेसाठी कार्य करण्याची एक वैश्विक प्रेरणा बनली आहे.

[email protected]