एरव्ही रेल्वे प्रवासात आपल्या आरक्षित जागेवर कुणी येऊन बसलं तर त्या प्रवाशांना उठवण्यासाठी बाह्या वर सरसावल्या जातात. मात्र नुकताच एक वेगळा अनुभव आला की आपल्या जागेवर येऊन बसलेल्या विनातिकीट प्रवाशाला पाहून अन्य प्रवासी स्वत:ची जागा देखील सोडून पळाले. अर्थात तो प्रवासी म्हणजे साप होता.
मध्य प्रदेशातील जबलपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. रेल्वेतील वरच्या बाजूच्या बर्थला असलेल्या लोखंडी रॉड भोवती एक लांब साप लटकलेला पाहून ट्रेनमधील प्रवाशांना धक्काच बसला.
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोच क्रमांक G17 मध्ये एका प्रवाशाला साप दिसला. त्याने इतर प्रवाशांना सावध केलं. यावेळी त्या डब्ब्यात घबराट पसरली. अनेकांनी आपल्या जागा सोडल्या. काहींनी मोबाइलमध्ये हा क्षण टिपला. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त आहे. सारे प्रवासी देखील सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे.