कुडावळेतील पांढरे दाम्पत्याची पडवळाची शेती बहरली; 6 फुटी लांबीच्या पडवळांचे 18 जून पासून उत्पादन सुरू

ईच्छा असली की मार्ग सापडतो आणि मेहनत केली तर केल्या श्रमाच्या कामाचे आपल्याला फळही चांगलेच मिळते या उक्तीचा प्रत्यय यावा अशाप्रकारचे यशस्वी काम कुडावळेत राहणाऱ्या चैत्राली आणि चंद्रकांत पांढरे या शेतकरी दाम्पत्यांने केले आहे. चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर दिवस रात्र राबुन टांगर गणपतीपुळेत पडवळाच्या शेतीचा यशस्वी मळा फुलविला आहे.

दापोली तालूक्यातील कुडावळे देवखोलवाडी येथे राहणाऱ्या मात्र आपल्या घरापासून 12 किलो मीटर अंतर लांब असलेल्या टांगर गणपतीपुळे गावात दररोज पायपीठ करत प्रकाश पाटणे यांच्या शेत जमिनीत चैत्राली आणि चंद्रकांत पांढरे या दाम्पत्याने पडवळाची शेती यशस्वी केली आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय खताची मात्रा देवून केलेली ही गावठी पडवळाची लागवड आहे. ही पडवळाची लागवड चांगलीच बहरली असून पडवळांच्या वेलींना साधारणपणे 6 ते साडेसहा फुट लांबीची पडवळ लागलेली आहेत.

कुडावळेतील चैत्राली आणि चंद्रकांत पांढरे हे दाम्पत्य चिकाटीने मेहनतीने आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आपले कसब पणाला लावत असतात. आतापर्यंत ते सेंद्रिय खताच्या मात्रा देवून विविध प्रकारच्या भाजीपाला लागवडी करण्यात कमालीचे यशस्वी झालेले आहेत. अशाच प्रकारे यावेळी केलेल्या पडवळ शेतीच्या लागवडीत त्यांच्याकडे 6 फुट लांबीची पडवळ झालेली आहेत. याबाबत त्यांचे कौशल्य जाणून घेता ते म्हणाले की, ”मी 25 एप्रिल 2024 रोजी गावठी पडवळाच्या 350 अळींमध्ये साधारपणे 600 ते 650 पडवळाच्या वेलींच्या रोपांची लागवड केली त्याला फळधारणा होवून पडवळांच्या वेलींना लागलेल्या पडवळांपैकी बहुतांश पडवळ ही 6 फुट लांबीची पडवळे लागलेली आहेत. 18 जून पासून प्रतिदिन किमान 40 किलो पडवळांचा काढा होत आहे. काढलेल्या पडवळांची विक्री पत्नी चैत्राली ही दापोली बाजारपेठेत जावून विकायला बसते. तर काही पडवळे ही घाऊक दरात भाजी विक्रेत्यांना विक्रीसाठी दिली जातात त्यामुळे साधारणपणे सरासरी 50 ते 60 प्रती किलो दर मिळतो.