नागिणीचा शोक, नागाच्या मृत्युनंतर कित्येक तास त्याच्या जवळ ठाण मांडून बसली

माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येही प्रेम जिव्हाळा असतो. एखादा जोडीदार गमावण्याचं दु:ख जसं एखाद्या व्यक्तीला होतं त्याचप्रमाणे प्राण्यांनाही अशा वेतना होतात. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात अशीच अनोखी घटना समोर आली आहे. येथे जेसीबी मशिनच्या साह्याने शेताची साफसफाई करत असताना एका नागाचा मृत्यू झाला. तर नागीण जखमी झाली. मात्र, जखमी नागीण त्या जागेवरून जराही हलली नाही. ती बराच वेळ नागाच्या शेजारीच होती. हे दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांची तोबा गर्दी झाली होती. मात्र, गर्दी होऊनही नागीण काही जागची हलली नाही.

शिवपुरी जिल्ह्यातील नरवार तालुक्यातील छत्री गावात एक शेतकरी जेसीबी मशिनच्या साहाय्याने आपली शेतजमीन साफ करत होता. खोदकाम सुरू असताना जेसिबीचा पंजा जमिनीतील बिळाला लागला. यामुळे बिळातील नागाचा मृत्यू झाला तर नागीण गंभीर जखमी झाली. हे पाहून जेसीबी चालकाने काम बंद केले आणि मृत साप उचलून फेकण्यासाठी खाली उतरला. पण जेसीबी ड्रायव्हर नागापाशी पोहोचताच नागिणीने फणा काढला आणि नागाजवळच उभी राहिली.

हे दृश्य पाहून जेसीबी ड्रायव्हरने काढता पाय घेतला. या घटनेची माहिती संपूर्ण गावात पसरली. त्यामुळे या नागाच्या जोडीला पाहण्यासाठी गावकऱ्यांची तोबा गर्दी झाली. या घटनेनंतर बराच वेळ नागीण नागाजवळ थांबली होती. यामुळे शेत मालकाने सर्प मित्राला बोलावले. यानंतर सर्पमित्राने नागिणीवर प्रथमोपचार करून तिला जंगलात नेऊन सोडले. नाग आणि नागिणीची ही जोडी किमान 16 ते 17 वर्षांपासून एकत्र असल्याची माहिती सर्प मित्राने गावकऱ्यांना दिली.