औषधी वनस्पतींच्या नावाखाली खेचरांवरून सुरू होती सोन्याची तस्करी, लडाखमध्ये सीमाभागात 108 किलो सोनं जप्त

बॉलिवूडमध्ये बॉर्डर, रिफ्यूजी हे चित्रपट चांगले गाजले होते. यामध्ये सीमेवरील भागात होणारी तस्करी, तस्करी रोखण्यासाठीचे हिंदुस्थानी जवानांचे प्रयत्न सारं अगदी जबरदस्त अंदाजात दाखवले आहे. अगदी चित्रपटाला शोभेल अशीच एक घटना लडाखमधील हिंदुस्थान-चीन प्रत्यक्ष नियंत्रण परिसरात घडली आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी (ITBP) लडाखमधील चीन सीमेजवळ प्रत्येकी एक किलो वजनाचे 108 सोन्याचे बारा जप्त केले आहेत. हिंदुस्तान-चीन सीमेजवळ अलीकडच्या काळात पकडण्यात आलेली सोन्याची ही सर्वात मोठी तस्करी मानली जात आहे.

तस्करी केलेल्या सोन्याची किंमत 70 कोटी रुपये असून तेनझिंग टारगे आणि शेरिंग चंबा या दोन जणांना सीमा सुरक्षा दलाने अटक केली आहे.

या दोघांकडून तस्करीसाठी वापरले जाणारे मोबाईल फोन, चाकू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर, ITBP च्या 21 व्या बटालियनच्या सैन्याने तस्करांची घुसखोरी रोखण्यासाठी पूर्व लडाखमधील चांगथांग उप-सेक्टरमध्ये 18,000 फूट उंचीवर ऑपरेशन सुरू केले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीरापलमध्ये दोन लोकांना खेचरांवर बसलेल्या जवानांनी पाहिले आणि त्यांना थांबण्यास सांगितले.

दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या दोघांनी सांगितले की ते औषधी वनस्पतींचे विक्रेते म्हणून काम करत होते परंतु त्यांच्या सामानाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले.

‘आयटीबीपीने सीमेवरील कारवाईदरम्यान जप्त केलेले सोन्याचा हा सर्वात मोठा साठा आहे. जप्त केलेले साहित्य सीमाशुल्क विभागाकडे सुपूर्द केले जाईल’, असे 21व्या आयटीबीपी बटालियनचे कमांडंट अजय निर्मळकर यांनी सांगितले.

ITBP देशाच्या पूर्वेकडील 3,488 किमी लांबीच्या हिंदुस्थान-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे (LAC) रक्षण करते.