डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात मुंबईच्या समुद्रकिनारी पसरलेले धुरके तसेच वाढलेल्या प्रदूषणाचा मासेमारीवर विपरीत परिणाम झाला आहे. मासळीच्या उत्पन्नात जवळपास 70 टक्क्यांची घट झाल्याने मासे महागले आहेत. सरंगा आणि सुरमई मासळीच्या दरात जवळपास अडीच ते तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे खवय्यांची मोठी पंचाईत झाली असून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खिशाला चांगलाच भुर्दंड बसत आहे.
दरवर्षी थंडीच्या हंगामात मासळीच्या उत्पन्नात 50 ते 60 टक्क्यांची घट होते. यंदा थंडीबरोबरच शहर व उपनगरांत धुरक्याचे साम्राज्य निर्माण झाले. त्याचा मोठा फटका मासेमारीला बसला. धुरक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मच्छीमारांना मासे शोधणे मुश्कील बनले आहे. परिणामी, मासळीच्या उत्पन्नात आणखी 8 ते 10 टक्क्यांची घट झाली आहे. एकूण 70 टक्क्यांनी मासळी उत्पन्न घटल्याने माशांच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस मध्यम आकारातील सरंगा 800 रुपयांना उपलब्ध होत होता. या सरंग्याच्या दरात अडीच पट वाढ झाली असून सध्या सरंगा विकत घेण्यासाठी दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत.
मासळीची दरवाढ होण्यामागील कारणे
मागील 10 ते 15 दिवस शहरात धुरके पसरले. परिणामी, मच्छीमारांना अधिक खोल समुद्रात जावे लागत असून बोटी उशिरा येत आहेत. त्यामुळे मासळीची उपलब्धता कमी झाली असून बोटींचा खर्चही वाढला आहे.
डिझेलसाठी साधारण 1 लाख 14 हजार रुपये इतका खर्च येतो. या खर्चात सध्या जवळपास 50 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
त्याचबरोबर बर्फ व मजुरीतही वाढ झाली आहे. बर्फाचा प्रतिटन दर 2,220 रुपयांवर गेला आहे. अतिरिक्त पाच दिवसांच्या कालावधीतील बर्फासाठी 33 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे.
समुद्रातील दृश्यमानता कमी झाल्याने मासेमारी बोटींना मासेमारीसाठी 100 सागरी मैल इतका टप्पा पार करून खोल समुद्रात जावे लागत आहे. परिणामी, इंधनाची आवश्यकता वाढली आहे. यापूर्वी समुद्रात 15 ते 20 सागरी मैलांवर मासळी मिळत होती. आता मत्स्य उत्पादनासाठी दहा दिवस लागत आहेत. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. पाच दिवसांसाठी 1,200 लिटर डिझेलची आवश्यकता भासते. इंधनाची ही गरज दुपटीने वाढली आहे.
देवेंद्र तांडेल, मच्छीमार संघटनेचे प्रमुख