अभिप्राय – नवलेखकाचा प्रवास

>> अस्मिता प्रदीप येंडे

एक वाचक म्हणून आतापर्यंत आपण बरीच पुस्तके वाचली असतील; पण लेखकाच्या अंतरंगातील संहिता ते पुस्तक हा प्रवास नेमका कसा घडतो, असा प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. आपण वाचक म्हणून त्या पुस्तकाकडे पाहत असतो. जेव्हा एखादा सामान्य माणूस एखादा विषय विशिष्ट आकृतिबंधात मांडतो, तो लेखक म्हणून जनमानसात ज्ञात होण्यासाठी पुस्तक प्रकाशित होणे गरजेचे आहे. पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुस्तक छापायचे कसे, इथून सुरू होतो नवलेखकाचा प्रवास. तो प्रवास नेमका कसा घडत जातो, हे सांगणारी नवी कादंबरी म्हणजे ‘पुस्तक पाहावे छापून!’

या कादंबरीतून एका नवोदित लेखकाला आपले पुस्तक प्रकाशित करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, लेखक म्हणून नव्या अनुभवांशी तो कसा जुळवून घेतो तसेच प्रकाशन क्षेत्रातील बऱयाच घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपले पुस्तक प्रकाशित व्हावे, या प्रबळ इच्छेने लेखक पांडे प्रयत्न करत असतात. रामपल्ले सरांकडून त्यांना प्रोत्साहन मिळत असते. रामपल्ले सर आणि पांडे यांच्या संवादातून हे जाणवते की, ते लेखकाला प्रेरणा देत असतात आणि योग्य तो सल्लाही. आपल्या पुस्तकाला आवडत्या लेखकाची प्रस्तावना असावी म्हणून लेखक प्रा. देशपांडे यांना विनंती करतात; पण एकंदरीत त्यांच्या बोलण्याचा सूर अधिक कठोर आणि दुसऱयाला कमी लेखण्याची वृत्ती यामुळे ते सतत अहंभावात जगताना दिसतात. असे बरेच प्रसंग कादंबरीत लेखकाने दर्शवले आहेत, ज्यातून नवोदित लेखकाला प्रोत्साहित न करता कमीपणाची जाणीव करून देणाऱया प्रवृत्तीही आहेत.

आपल्या कवितांचे पुस्तक व्हावे म्हणून लेखक पांडे आपल्या परीने वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांचा शोध घेण्यास सुरुवात करतात. प्रकाशनाच्या कार्यालयात जाऊन पुस्तकाविषयी चौकशी करतात, माहिती गोळा करतात. याद्वारे प्रकाशन संस्था कशा पद्धतीने काम करतात, त्यांच्या कामांची प्रक्रिया कशी असते तसेच पुस्तक प्रकाशित करताना संहितेचे टंकलेखन, प्रूफ, मुद्रितशोधन, मूखपृष्ठ संकल्पना, छपाईचा कागद, छपाईचा खर्च ते पुस्तकाची बांधणी या सर्व घटकांचा समावेश असतो, याची नव्या लेखकाला कल्पना नसते. एका पुस्तक निर्मितीमागे किती मोठी प्रक्रिया असते, मेहनत असते, हेही या कादंबरीद्वारे लक्षात येते.

जसजसे कथानक पुढे जाते, वाचकालाही प्रश्न पडतो, या लेखकाचे पुस्तक प्रकाशित होणार की नाही. कथानकातील लेखकाचा संयमित स्वभाव प्रत्येक प्रसंग कुशलतेने हाताळतो. कुठेही आपला तोल न देता होणारा त्रास सहन करून परिस्थिती सांभाळून घेण्याची वृत्ती खरेच कौतुकास्पद आहे. या कादंबरीतून जी पात्रे लेखकाने उभी केली आहेत, उदा – प्रा. देशपांडे, प्रकाशक देशमुख, लेखक रामपल्ले, प्रकाशक जाधव इत्यादी. त्या पात्रांद्वारे आपल्या आसपास असणाऱया विविध मनोवृत्तीची विचारसरणी अधोरेखित केली आहे. समाजात वेगवेगळ्या विचारांची माणसे भेटतील, चांगली-वाईट; कोणाकडून काय घ्यायचे हे आपल्या हातात असते, नाही का? एका सामान्य माणसाचा लेखक म्हणून प्रवास तसा सोपा नसतो. प्रकाशन संस्था या लेखकाच्या विचारांना प्रकाशात आणण्याचे कार्य करत असतात. त्यामुळे प्रकाशकांनी नवोदित लेखकांना प्रोत्साहन द्यावे, हीच भावना या कादंबरीतून व्यक्त केली आहे. या कादंबरीतून प्रकाशन संस्थांचे स्वरूप किंवा लेखकाला आलेले विचित्र अनुभव, हे सर्व ठिकाणी सारखे असतात असे नाही. काही अपवादही असतात. व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. या कादंबरीतील लेखकाचे पुस्तक प्रकाशित होते की नाही, हाच मूळ प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी! मग तुम्ही कधी छापणार तुमचे पुस्तक?

पुस्तक पाहावे छापून!
??लेखक ः सुनील पांडे
? प्रकाशक ः स्नेहवर्धन प्रकाशन ? मूल्य ः 250 रुपये