दप्तराच्या ओझ्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाठदुखीची व्याधी

शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या. मात्र अनेक ठिकाणचे शाळा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने दप्तराचे ओझे कमीच होईना झाले आहे. वह्या, पुस्तके, खाऊचा डबा, व्यवसाय पुस्तके, वॉटर बॉटल आदी साहित्याच्या वजनामुळे चिमुकले विद्यार्थी पाठदुखीने बेजार झाले आहेत.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारने अनेकदा घोषणा केल्या. त्यासाठी शालेय पातळीवर सूचनाही देण्यात आल्या. शिक्षण विभागाने पुस्तकांमध्येच वह्यांची पाने जोडून देण्यासह अनेक उपाययोजना राबवल्या. तर शाळांनीही त्यांच्या पातळीवर ओझे कमी करण्यासाठी अनेक प्रयोगही
राबवले. मात्र त्यात सातत्य नसल्याने उपाययोजनांची अंमलबजावणीच होत नसल्याची नाराजी पालक वर्षा मुकणे यांनी व्यक्त केली.

प्रत्येक शाळेचे वेगळे नियम
राज्यातील सर्व शाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात चार भागांमध्ये विभागून प्रत्येक पाठ, कवितेनंतर गरजेनुसार कोरी पाने समाविष्ट केली. त्याचबरोबर प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वह्या न आणता पाठ्यपुस्तकात देण्यात आली. मात्र जव्हार शहरासह ग्रामीण भागातील खासगी शाळा आपले स्वतःचे नियम बनवत असल्याने लेखन, वाचन साहित्याचे ओझे वाढतच आहे.

■ प्रमाणापेक्षा अतिरिक्त वजनाचे दप्तर शाळेत घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठदुखी, सांधे आखडणे, मणक्याची झीज होणे, मान दुखणे, स्नायू आखडणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यांसारख्या व्याधी वाढल्या आहेत.

■ शाळांनी स्वच्छ पाणी दिले तर विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होईल. त्यासाठी नगर परिषद, ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश कुरबुडे यांनी व्यक्त केले.