
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात आता 30 टक्के अभियंत्यांना ‘कायमस्वरूपी’ तत्त्वावर नियुक्ती दिली जाणार आहे. तर उर्वरित 70 टक्के अभियंते प्रतिनियुक्तीवर नेमले जाणार आहेत. यासाठी आवश्यक असणाऱया अभियंता भरती नियमांत बदल करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात आतापर्यंत कोणाचीही कायस्वरूपी नियुक्ती केली जात नव्हती. त्यामुळे या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकणात अभियंते कायस्वरूपी असावेत अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अभियंत्यांच्या भरती नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला असून 30 टक्के ‘म्हाडा’ अभियंत्यांना ‘कायमस्वरूपी’ नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातून (म्हाडा) प्रतिनियुक्तीवर आलेले 30 टक्के अभियंते पर्मनंट नियुक्त केले जातील.
कार्यमुक्त होण्यापासून अभय
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी म्हणून प्राधिकरणातील मुदत संपलेले व मुदत संपण्यास आलेल्या अभियंत्यांकडून प्रयत्न केले जात होते. या पार्श्वभूमीवर आता प्रतिनियुक्तीवर असलेल्या 50 टक्के म्हाडा अभियंत्यांपैकी 30 टक्के कायमस्वरूपी नियुक्ती मिळणार आहे. या नियमामुळे प्राधिकरणात मुदत संपलेल्या अनेक अभियंत्यांना कार्यमुक्त होण्यापासून अभय मिळणार आहे.