धिम्या रस्ते कामांमुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक! फक्त 25 टक्केच कामे पूर्ण; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे आव्हान

मुंबईतील सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या धोरणात शेकडो रस्त्यांची कामे एकाच वेळी करण्यास सुरुवात केल्याने मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला आहे. पालिकेने हाती घेतलेल्या एकूण कामांमधील फक्त 25 टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये ठिकठिकाणी कामे सुरू असल्याने वाहतूक वळवली जाणे, एकाच रस्त्यावर वाहनांची दुतर्फा वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामांपैकी जास्तीत जास्त कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर राहणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे अडीच हजार कि.मी.चे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्यांमुळे पालिकेला नेहमीच सर्व स्तरातून टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिकेने सर्वच रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून मुंबईला खड्डेमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार सहा हजार कोटींवर खर्च करून दोन टप्प्यांत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. पहिल्या टप्प्यात 324 कि.मी. लांबीच्या 698 रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यामध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरामधील रस्ते कामांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 377 कि.मी. लांबीच्या 1420 रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यामध्ये शहर विभागातील 133 कि.मी. लांबीच्या 503 रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करणार

रस्ते कामाच्या फेज-1मध्ये 698 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे. यातील आतापर्यंत फक्त 187 रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 213 कामे सुरू आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

फेज-2मधील कामे पावसाळ्यानंतरच

पालिकेने हाती घेतलेल्या कामांमध्ये फेज-2मध्ये 377 कि.मी. लांबीच्या 1420 रस्त्यांच्या कामांचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात 503 रस्ते, पूर्व उपनगरातील 261 आणि पश्चिम उपनगरातील 656 रस्त्यांचा समावेश आहे. यामधील 433 रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून ही कामे पावसाळ्यानंतरच पूर्ण होतील,अशी स्थिती आहे.