नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचा खतरनाक पॅटर्न; सिडकोचे अधिकारीही चक्रावून गेले

घराचे स्लॅब टाकल्यानंतर ते सर्वसामान्यपणे 21 दिवसांत उघडले जाते. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा कालावधी आठवडा ते पंधरवड्यावर आला आहे. स्लॅब उघडल्यानंतर घराचे बांधकाम केले जाते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भिंतीचे आणि छताचे प्लास्टर होते. त्यानंतर लादी बसवण्याचे काम केले जाते. मात्र आता हा बांधकामाचा निकष भूमाफियांनी मोडीत काढला असून अनधिकृत इमारतीचे स्लॅब, बांधकाम, प्लास्टर आणि लादी बसवण्याची कामे एकाच वेळी सुरू केली जात आहे. पंधरवड्यात इमला उभा करून रहिवासी वापर सुरू करण्याचा अनधिकृत बांधकामाचा नवा पॅटर्न नवी मुंबईत सुरू झाल्यामुळे सिडको आणि महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

करावे गावात पामबीच मार्गालगत भुयारी मार्गाजवळ पंधरवड्यात उभ्या राहिलेल्या एका अनधिकृत बांधकामावर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने नुकतीच कारवाई केली. हा भूखंड महिनाभरापूर्वी मोकळा होता. भूमाफियांनी हा भूखंड हडप करून तिथे पाया खोदला. रात्र आणि दिवसपाळीत काम सुरू ठेवून हा पाया तातडीने भरून काढला. त्यानंतर तिथे इमारत बांधण्यासाठी कॉलम उभे करण्यात आले. कॉलम ओले असतानाच त्याच्यावर स्लॅब टाकण्यात आला. तीनच दिवसात हा स्लॅब खोलून भिंती बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. याच कामाबरोबर लादीही बसवून पूर्ण झाली. बांधकाम सुरू झाल्यापासून पंधरा दिवसातच इमला उभा करून तिथे दुकाने सुरू झाली. पाठीमागच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये कुटुंब राहायला आले. अनधिकृत बांधकामाचा हा वेग पाहून चक्रावलेल्या सिडको प्रशासनाने हा इमला जमीनदोस्त केला. या इमारतीमधील दुकानाचे ज्या दिवशी उद्घाटन होते, त्याच दिवशी या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला.

दोन हजार बांधकामे जमीनदोस्त 

नवी मुंबईमध्ये गेल्या पाच वर्षांत अनधिकृत बांधकामाचा वेग कमालीचा वाढला आहे. विजेच्या वेगाने दिघ्यापासून पनवेल, उरणपर्यंत अनधिकृत इमले उभे राहत आहेत. सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली २ हजार १०२ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. 2 लाख 6 हजार 431 चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड भूमाफियांच्या तावडीतून मुक्त करण्यात आले आहेत.

चौकशी करूनच घरे घ्या 

अनधिकृत बांधकामे हटवण्याच्या मोहिमांबरोबरच नागरिकांना सावध करण्याकरिता सिडकोतर्फे अतिक्रमणधारक/अनधिकृत बांधकामधारकांना बजावण्यात आलेल्या नोटिसा वेळोवेळी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे. नवी मुंबई किंवा नैना क्षेत्रामध्ये सदनिका किंवा दुकाने खरेदी करताना संबंधित बांधकामाबाबतची कागदपत्रे तपासावीत. चौकशी करूनच घरे घ्यावीत, असे आवाहन मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी केले आहे