महात्मा गांधी रुग्णालयात बेडजवळच कोसळला स्लॅब; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

परळ येथील ‘ईएसआयसी’ महात्मा गांधी रुग्णालयात गैरसुविधांमुळे गोरगरीब रुग्ण हैराण होत असतानाच आज पहाटेच्या सुमारास रुग्ण झोपलेल्या बेडजवळच स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. अशा घटना वारंवार घडत असल्याने रुग्णांच्या सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी केली आहे.

स्लॅब कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच आमदार अजय चौधरी यांच्या निर्देशानुसार माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी रुग्णालयाला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयातील गैरसुविधांचा आढावाही घेतला. महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाची सध्या दयनीय अवस्था झालेली असून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. तसेच दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करूनही गळतीचे प्रमाण वाढलेले आहे.  औषधांच्या स्टोअर्समध्ये गळती होत असल्यामुळे औषधे खराब होत आहेत, असा आरोपही कोकीळ यांनी केला आहे. रुग्णालयातील गैरसुविधांबाबत प्रशासनाला जाब विचारला जाईल, असेही ते म्हणाले. या ठिकाणी रुग्ण अतिशय भीतीच्या वातावरणात दाखल होऊन उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शंकर लांबाडे, नितीन दळवी, उमेश अधिकारी, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.