यान्सनने 7 विकेट टिपत केली कमालl; श्रीलंका 42 धावांत ढुस्स, कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा नीचांक

कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा संघ प्रथमच पन्नाशीत ढुस्स झाला. यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत पाहुण्या श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 13.5 षटकांत 42 धावांत गुंडाळला. ही श्रीलंकेची कसोटी क्रिकेट इतिहासातील नीचांकी धावसंख्या ठरली. याआधी त्यांचा नीचांक 71 धावा होता. लंकेकडून फक्त दोनच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारता आली, तर पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सनने 13 धावांत 7 विकेट टिपत श्रीलंकेची दाणादाण उडवली. दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात  3 बाद 132 अशी मजल मारत आपली आघाडी 281 पर्यंत नेली.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 49.4 षटकांत 191 धावसंख्या उभारली होती. इतकी कमी धावसंख्या उभारली म्हणून यजमान संघावर टीकेची झोड उडालेली असतानाच त्यांनी श्रीलंकेला 42 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 149 धावांची मोठी आघाडी घेत आपल्या चाहत्यांना दिलासा दिला. श्रीलंकेकडून कामिंदू मेंडिस (13) व लाहिरू कुमारा (नाबाद 10) यांनाच दुहेरी धावा करता आल्या. दिनेश चंडीमल, कुसल मेंडिस, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो व असिथा फर्नांडो या श्रीलंकन फलंदाजांना, तर खातेही उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सेनने 6.5 षटकांत एका निर्धाव षटकासह 13 धावांत 7 फलंदाज बाद केले. त्याची ही कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होय. गेराल्ड कोएत्झीला 2, तर कॅगिसो रबाडाला 1 बळी मिळाला.

त्याआधी, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाच्या 4 बाद 80 धावसंख्येवरून खेळ पुढे खेळायला सुरुवात केली. त्यांचा पहिला डाव 49.4 षटकांत 191 धावसंख्येवर संपुष्टात आला. यात कर्णधार तेम्बा बावुमाने सर्वाधिक 70 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स (16), मार्को यान्सन (13) हे बाद झाल्यानंतर केशव महाराज (24) व कॅगिसो रबाडा (15) यांनी तळाला थोडाफार प्रतिकार केला. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो व लाहिरू कुमारा यांनी प्रत्येकी 3-3 फलंदाज बाद केले, तर विश्वा फर्नांडो व प्रभात जयसूर्या यांना 2-2 विकेट मिळाल्या.