SL Vs NZ – न्यूझीलंडवर श्रीलंकेचे वर्चस्व, 140 धावांनी पराभव करत 10 वर्षांनी केला असा पराक्रम

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा 140 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने यापूर्वीच जिंकली आहे. परंतु तिसरा सामना जिंकून श्रीलंकेने 10 वर्षांचा पराभवाचा दुष्काळ संपूष्टात आणला आहे.

ऑकलंडच्या इडन पार्कमध्ये उभय संघांमध्ये सामना खेळवण्यात आळा. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराच्या निर्णयाचा मान ठेवत सलामीला आलेल्या निसांकाने धुवाँधार फलंदाजी करत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 66 धावांची वादळी खेळी केली. त्याच बरोबर कुशल मेंडिस (54 धावा), कामिंदू मेंडिस (46 धावा) आणि लियांगे (53 धावा) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे त्यांनी 8 गड्यांच्या मोबदल्यात 290 धावा केल्या होत्या. प्रत्तुयत्तरात न्यूझीलंडचा संघ पत्त्यांसारखा कोसळला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघ 150 या धावसंख्येवरच तंबूत धाडला. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमन याने एकट्याने खिंड लढवत 81 धावा केल्या, परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे न्यूझीलंडचा 140 धावांनी पराभव झाला.

श्रीलंकेने ही मालिका गमावली असली तरी हा विजय त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. कारण श्रीलंकेची न्यूझीलंडमधील कामगिरी खूपच वाईट आहे. 2015 साली श्रीलंकेने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी विजय संपादित केला होता. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. तब्बल 10 वर्ष त्यांना वनडे सामना जिंकण्याची प्रतिक्षा करावी लागली होती. आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून 10 वर्षांचा दुष्काळ श्रीलंकेने संपुष्टात आणला आहे.