हरयाणा-पंजाबच्या खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे उपोषण 48 दिवसांपासून सुरू असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशातच खनौरी सीमेवर 10 महिन्यांपासून आंदोलन करणारे 80 वर्षीय शेतकरी जग्गा सिंग यांचा आज मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
थंडीच्या कडाक्यामुळे जग्गा यांची प्रकृती बिघडली. त्यात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. पतियाळा येथील राजिंद्र रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांची आज प्राणज्योत मालवली. जग्गा सिंग यांच्या मृत्यूनंतर शेतकरी नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. डल्लेवाल यांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास जे काय होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल. परिस्थिती केंद्र आणि राज्य सरकारांच्याही हाताबाहेर जाईल असा इशारा शेतकरी नेत्यांनी मोदी सरकारला दिला आहे.
जग्गा सिंग हे फरीदकोटमधील गोदराचे रहिवासी आहेत. त्यांना 5 मुले आणि एक मुलगी आहे. आज खनौरी सीमेवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित गोदरा या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात होणार आहेत. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी शंभू सीमेवर एका शेतकऱयाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रेशम सिंग (55) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
खनौरी आणि शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या एकजुटीसाठी संयुक्त किसान मोर्चाने 15 जानेवारीला बोलावलेली बैठक आता 13 जानेवारीला होणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने याबाबतची माहिती दिली असून या संघटनेने खनौरी येथे सुरू असलेल्या मोर्चाच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. पाटण येथील जुन्या बसस्थानकाजवळील गुरुद्वारा साहिब येथे ही बैठक होणार आहे.
सरकारवर दबाव आणावा; डल्लेवाल यांचे धर्मगुरूंना पत्र
शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी विविध धर्मांतील महंत तसेच धर्मगुरूंना पत्र लिहून शेतकऱयांच्या मागण्या करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन केले आहे. सरकार अनेकदा आपल्या योग्य मार्गापासून भरकटल्याचे इतिहासात अनेकदा सिद्ध झाले आहे. या सरकारला योग्य मार्गावर आणण्यासाठी धर्मगुरू, महंतांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
- गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनाचा दुसऱयांदा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत चार शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे.