
विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त होत असतानाच आज सहावा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने नवा ट्विस्ट आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी दौंड तालुक्यातील उमेश म्हेत्रे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने तीन तर मिंधे गट आणि अजित पवार गटाने प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा केली आहे.
भाजपने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर संजय केणेकर आणि माजी आमदार दादाराव केचे यांना संधी दिली आहे. मिंधे गटातर्फे चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवार गटातर्फे संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना त्यावर सूचक आणि अनुमोदक म्हणून विद्यमान आमदारांच्या सह्या लागतात. म्हेत्रे यांच्या अर्जावर तशा सह्या नसल्याने पडताळणीत त्यांचा अर्ज बाद ठरेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.