किवळे येथे 16 वर्षीय मुलाने राहत्या घराच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी मध्यरात्री घडली. ऑनलाइन गेम खेळताना दिलेल्या टास्कमुळे मुलाने उडी मारल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे.
आर्या उमेश श्रीराव (वय 16, रा, रुणाल गेटवे, किवळे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आर्या हा चिंचवड येथील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील उमेश हे नायजेरिया येथे एका कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांची पत्नी गृहिणी असून, मोठा मुलगा आर्या आणि लहान मुलासमवेत रुणाल गेटवे सोसायटीत चौदाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहते. आर्या हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. इयत्ता नववीमध्ये तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून तो ऑनलाइन गेमच्या आहारी गेला होता, असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. आर्या हा स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. त्यामुळे आई-वडीलही चिंतेत होते. अतिवृष्टीमुळे 25 जुलै रोजी शाळांना सुट्टी होती. तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातच घालवला. रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीत जाऊन बसला. आई दुसऱ्या मुलाला ताप आल्याने त्याच्याकडे लक्ष देऊन होती. रात्री एक वाजला तरीदेखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळे आई जागीच होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हॉट्सअॅपवर एक मुलगा खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज वाचताच आईने आर्याच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. पण आर्या घरात नव्हता. त्या त्वरित खाली गेल्या. यावेळी आर्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच आर्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आर्याने त्याच्या वहीमध्ये लॉगआउट… लॉगआउट… लॉगआउट असा मजकूर लिहिलेला आढळला आहे. मात्र, यातून त्याला काय नमूद करायचे होते, हे स्पष्ट होत नाही. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
मुलाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, मुलाला ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला होता. त्या अनुषंगाने मुलाचा लॅपटॉप ताब्यात घेऊन तपास केला जाणार आहे.
– महेंद्र कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रावेत)
ऑनलाइन गेमवर बंदीचा गृहमंत्र्यांचा आदेश कागदावरच
एक वर्षापूर्वी देहूरोड येथील लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा गेमिंग टास्क पूर्ण करण्यासाठी धावत्या रेल्वेसमोर उभा राहिला होता. यात त्याचा मृत्यू झाला होता. राज्यात अशा ऑनलाइन गेममधील टास्क पूर्ण करताना अनेक मुलांना जीव गमवावा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पब्जीसारख्या ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या आदेशाची अद्यापही अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. असे अनेक जीवघेणे ऑनलाइन गेम सर्रासपणे खेळले जात आहेत. किवळे येथील घटनेतून त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.