सतत वीजपुरवठा खंडीत होणे, अनेक ठिकाणी वीजच पोहोचलेली नाही. पाणी नाही, चांगले रस्ते नाहीत, डॉक्टर गाठण्यासाठी कित्येक मैल पायपीट करून शहराकडे धाव घ्यावी लागते. अशा प्रकारे सुविधांची अक्षरशः वानवा असल्यामुळे अमरावतीच्या मेळघाटातील रंगूबेली, धोकडा, पुंड, किन्हीखेडा, खोकमार आणि खामदा या सहा गावांमध्ये मतदान केंद्रावर एकही नागरिक फिरकला नाही. गावकऱयांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे या गावांतील मतदान केंद्र ओस पडल्याचे चित्र होते.
या गावांमध्ये एकूण एक हजार 300 मतदार आहेत. गावांतील अनेक समस्या न सुटल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. आधी सोयीसुविधा द्या, मग मते मागायला या अशी भूमिका गावकऱयांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मेळघाटातील चार गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. यात या वेळी दोन गावांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी रंगूबेली, धोकडा, पुंड आणि खामदा येथील गावकरी मतदान केंद्रांवर फिरकले नव्हते. मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना जोडणाऱया रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या गावात कुठले वाहनदेखील पोहोचू शकत नाही, अशी अवस्था आहे. यासह या चारही गावांमध्ये वीजपुरवठा नाही, पिण्याचे पाणीदेखील नाही, आरोग्य सेवादेखील उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी व निवेदने सादर करूनदेखील गावाच्या कुठल्याही प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे या चारही गावांतील ग्रामस्थांनी आम्ही मतदान करणार नाही, अशी भूमिका लोकसभेला घेतली होती आणि आता विधानसभेतही घेतली आहे.
जिह्यात इतरत्र उत्स्फूर्त मतदान
जिह्यात मात्र मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी पेंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. आठही मतदारसंघांमध्ये मतदानासाठी मोठय़ा संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिह्यात सकाळी पहिल्या दोन तासांत 6.08 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी 11 वाजेपर्यंत 17.45 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदान पेंद्राबाहेर रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अमरावती जिह्यात सरासरी 31.32 टक्के मतदान झाले आहे. 65 टक्क्यांच्या वर मतदानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.