![98th sahitya sammelan](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/98th-sahitya-sammelan-696x447.jpg)
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अवघे पाच दिवस उरले आहे. येत्या 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये मायमराठीचा उत्सव होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून किमान दोन ते अडीच हजार साहित्यप्रेमी दिल्लीत पोहचणार आहेत. याशिवाय दिल्लीतील स्थानिक मराठी जनांचा मोठा सहभाग असेल. तब्बल सहा ते साडेहजार मराठी जनांच्या उपस्थितीत दिल्लीत साहित्यमेळा पार पडणार आहे.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98 वे साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. संमेलनासाठी पुण्यातून 19 फेब्रुवारी रोजी विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे. महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव विशेष रेल्वेला देण्यात आले असून त्याला 16 बोगी आहेत. प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्पृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. स्पेशल ट्रेनमधून सुमारे 1200 लोक दिल्लीत पोहचणार आहेत. संमेलनासाठी 450 ते 500 प्रतिनिधी नोंदणी झाल्याचे समजते. याशिवाय महाराष्ट्रातून स्वतंत्रपणे साहित्यप्रेमी दिल्लीत पोहचणार आहेत.
राज्याच्या गावागावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा, तरुणांचा मोठय़ा संख्येने समावेश असणार असल्याचे सरहद पुणेचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया यांनी सांगितले.