अंदमान समुद्रात सहा हजार किलो ड्रग्ज जप्त

तटरक्षक दलाने अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रातून तब्बल सहा हजार किलो ड्रग्ज जप्त केले. पोर्ट ब्लेयरपासून 150 किलोमीटर अंतरावर एका बोटीतून दोन-दोन किलोची तीन हजार पाकिटे सापडल्याची माहिती तटरक्षक दलाच्या अधिकाऱयांनी दिली. या बोटीतून म्यानमारच्या सहा तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे.

24 नोव्हेंबर रोजी तटरक्षक दलाचे डोर्नियर विमान गस्त घालत असताना पायलटला एक बोट दिसली. या बोटीतून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा संशय आल्यानंतर विमान बोटीजवळ नेण्याचा प्रयत्न केला, परंतु बोटीचा वेग आणखी वाढवण्यात आला. त्यामुळे पायलटने पोर्ट ब्लेयर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. काही वेळातच संयुक्त कारवाई करून बोट ताब्यात घेतली.

दहा दिवसांपूर्वी पकडले 700 कोटींचे ड्रग्ज

तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने 15 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या पोरबंदर समुद्र किनाऱयावरून 500 किलोंचे ड्रग्स पकडले होते. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 700 कोटी रुपयांहून अधिक होती. दिल्ली अमली पदार्थ नियंत्रण विरोधी पथकाला या ड्रग्जबाबतची माहिती मिळाली होती.