सहा लाखांच्या नायलॉन मांजावर नागपूर पोलिसांचा बुलडोझर

मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित जीवघेण्या नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने तस्करी होत आहे. नागपुरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याने निदर्शनास येताच पोलिसांनी कारवाई केली. दिल्लीतून नागपूरला आलेला सहा लाखांचा मांजा जप्त करण्यात आला. नायलॉन मांजाच्या 600 चक्री पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चक्रीवर आज बुलडोझर चालविण्यात आला. कुख्यात आरोपी अमोल श्याम मोहंदेकर याने दहा बॉक्स नायलॉन मांजा मागवला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजली. मग तहसील पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपी अमोल आणि त्याचा साथीदार वाहनचालकाला ताब्यात घेत 600 नायलॉन मांजाच्या चक्री असलेले 10 बॉक्स जप्त केले.

नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा

नववर्षाच्या सुरुवातीपासून पोलिसांनी नायलॉन मांजाची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यावरही कारवाई करण्यास सुरुवात केली. 2 जानेवारी रोजी गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने शीतल विनोद मानमोडे नामक महिलेकडून नायलॉन मांजाच्या 16 चक्री जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध कलम 223 भा.न्या.सं. सहकलम 5, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम-1986, अन्वये पोलीस ठाणे शांतीनगर येथे गुन्हा दाखल केला.