तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर

कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2 लाख 64 हजार 22 जणांना कामावरून काढून टाकले तर 2022 ते 2024 या दोन वर्षांत तब्बल 5 लाख 81 हजार 961 लोकांना घरचा रस्ता दाखवला.

कर्मचारी कपातीवर वॉच ठेवणाऱ्या लेऑफ्स डॉट एफवायआय या संस्थेने ही माहिती दिली आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीने हिंदुस्थानात जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे, तर मेटा या प्रसिद्ध कंपनीने 3 हजार 600 लोकांना घरी बसवले. मेटानंतर एचपीई कंपनीने 2 हजार 500, एचपीने 2 हजार कर्मचाऱ्यांना, वर्क डे कंपनीने 1 हजार 750 कर्मचाऱ्यांना, ऑटो डेस्कने 1 हजार 350 कर्मचाऱ्यांना क्रूझ कंपनीने 1 हजार तर सेल्सफोर्सने 1 हजार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकले आहे.

जगभरात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून यामध्ये सर्वात जास्त नोकर कपात ही टेक कंपन्यांमध्ये झाली आहे. कंपन्यांनी चालवलेली नोकरकपात 2025 मध्येही सुरूच आहे. मार्चच्या अखेरीस मॉर्गन स्टॅन्ली 2 हजार कर्मचाऱ्यांना तर ऍमेझॉन कंपनीदेखील तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना काढणार आहे.