चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथे शुक्रवारी पहाटे धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच रात्रीत चोरट्यांनी सहा घरे फोडून 10 तोळे सोने, एक किलो चांदीसह 95 हजारांची रोकड लंपास केली. राचन्नावाडी येथे दिड महिन्यातील ही दुसरी घटल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी वाढवणा पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.
गावातील किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. दिड महिन्यापुर्वीच चोरट्यांनी तातेराव वागलगावे यांचे घर फोडून दोन तोळे सोने व 50 हजार रुपये लंपास केले होते. त्याच दिवशी अन्य दोन घरे फोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा तपास चालू असतानाच चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली आहे.
चोरी झाली की पोलीस पंचनामा करुन गुन्हा दाखल करतात. मात्र पुढे योग्य कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिसांविषयी नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपास जलदगतीने करून चोरट्यांना तात्काळ पकडावे आणि चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.