सरन्यायाधीशांच्या खुर्चीत बसून चंद्रचूड यांनी संविधानावर आघात, जनतेवर अन्याय केला; ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी व्यक्त केली चिंता

देशातील अराजकतेवर परखड मते व्यक्त करणारे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी रविवारी निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशांच्या खुर्चीत बसून संविधानावर आघात केला, जनतेवर अन्याय केला. अशा परिस्थितीत देशातील कायद्याचे राज्य बिघडवण्याला चंद्रचूड जबाबदार नाहीत का? देशात सध्या भयंकर स्थिती आहे. हे पाहून अत्यंत दुःख होतेय, अशा शब्दांत दवे यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी प्रचंड भावुक झाल्याने त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. दुष्यंत दवे यांनी ‘द वायर’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माजी सरन्यायाधीशांवर केलेल्या टीकेनंतर न्यायव्यवस्था आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपच्या हातातील खेळणे

चंद्रचूड यांनी न्यायदानाच्या विविध तत्त्वांना तिलांजली दिली. त्यांच्यावर राजकीय प्रभाव होता. किंबहुना, ते सत्ताधारी भाजपच्या हातातील खेळणे बनले. भाजपच्या तालावर नाचत होते, असा आरोप दवे यांनी केला.

अॅड. दवे काय म्हणाले…

1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार, 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रार्थनास्थळे ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत ठेवायची आहेत. असे असताना सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक संवेदनशील धार्मिक सौहार्दतेच्या गंभीर मुद्दय़ावर शैक्षणिक प्रयोग केले जाताहेत का?

राजस्थान असो वा उत्तर प्रदेश, जिथे जिथे भाजपची सत्ता आहे तिथे दोन धर्मांत तेढ निर्माण करणाऱया अशा घटना घडताहेत. तरीही न्यायालय काही करत नाही. चंद्रचूड यांनी देश व संविधानाला मोठी हानी पोहोचवली आहे.

संभलमध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचारात चार निष्पाप लोकांचा बळी गेला. त्याला न्यायपालिका जबाबदार नाही का? अशा धार्मिक हिंसाचारातून दोन समुदाय कायमचे विभागले जात आहेत, लोक जीव गमावताहेत. या जखमा कधीही भरून निघणार नाहीत.

देशात इतर अनेक कामे आहेत. 140 कोटी जनतेची काळजी घ्या. रोजगार निर्मिती करा. लोकांना दारिद्रय़ातून बाहेर काढा. शिक्षण, उत्तम आरोग्य, सामाजिक सौहार्द द्यायचे सोडून या सर्व गोष्टी आपले सरकार नष्ट करतेय.