वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा; सुरेश धस यांनी घेतली रश्मी शुक्ला यांची भेट 

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. या प्रकरणातील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी त्यांनी रश्मी शुक्ला यांच्याकडे केली.

या भेटीनंतर आमदार धस यांनी धनंजय मुंडेंच्या भेटीचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी 30 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यासोबत भेट झाली होती. ही भेट केवळ 20 मिनिटांची होती. मी लगेच तिथून निघालो होतो. पण बावनकुळे यांनी चार तास बैठक झाल्याची चुकीची माहिती दिली. ते तसे का बोलले याबाबत तुम्हीच त्यांना विचारा, असे सुरेश धस यांनी स्पष्ट सांगितले.