संतोष देशमुखांना मारहाण करताना चांडाळ नाचत होते! SIT ने मारहाण करतानाचा व्हिडिओ न्यायालयात सादर केला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने सोमवारी केज न्यायालयात सादर केला. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपी नाचत होते, आनंद घेत होते, असेही एसआयटीने म्हटले आहे. मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेली कत्ती, फायटर, तलवार, लाकडी दांडाही पुरावा म्हणून न्यायालयासमोर सादर करण्यात आला.

पवनचक्कीच्या वादातून सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची अतिशय अमानुष हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी त्याचा व्हिडीओ बनवला, तो ‘आका’ला दाखवला, असा गौप्यस्फोट नागपूर येथे विधिमंडळात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. या मारहाणीचे विदारक चित्र त्यांनी सभागृहासमोर मांडले होते. आमदार धस यांनी केलेल्या गौप्यस्फोटातील वास्तवच आज एसआयटीने केज न्यायालयासमोर
सादर केले.

खतरनाक शस्त्रेही न्यायालयासमोर

संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रेही एसआयटीने आज न्यायालयासमोर सादर केली. यात 41 इंचाचा गॅस पाईप असून त्याला काळय़ा करदोडय़ाची मूठ करण्यात आली आहे. लोखंडी वायर, लाकडी दांडा, कत्ती, तलवार, फायटर आदी शस्त्र चाही यात समावेश आहे.

चार आरोपींच्या सीआयडी कोठडीत वाढ

प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तीन आरोपींच्या सीआयडी कोठडीत बारा दिवसांची तर विष्णू चाटे याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार यांची सीआयडी कोठडी आज संपल्याने त्यांना केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. विष्णू चाटे याला न्यायालयासमोर वेगळे हजर करण्यात आले.

गिरीनार मंदिरात आरोपींचा मुक्काम

संतोष देशमुख यांची हत्या करून सगळे सातही आरोपी पसार झाले. त्यापैकी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे भिवंडीला गेले. तेथे दोन दिवस मुक्काम करून त्यांनी गुजरात गाठले. तेथील प्रसिद्ध गिरनार मंदिरात या आरोपींनी पंधरा दिवस मुक्काम ठोकला. पैसे संपताच या तिघांनी पुणे गाठले. पैशासाठी केजला पह्न केला आणि सुदर्शन तसेच सुधीर दोघे पोलिसांच्या जाळय़ात अडकले.

मालमत्ता किती?

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडच्या मालमत्तेविषयी खळबळजनक गौप्यस्पह्ट केले. ‘आका’ची बार्शी तालुक्यात 45 एकर, सोनपेठ तालुक्यात 45 एकर, शिरसी येथे 50 एकर, मांजरसुंब्यात दुसऱया पत्नीच्या नावावर 45 एकर जमीन आहे. अशी आणखी शेकडो एकर जमीन असून ती कुणाची आहे, असा सवाल त्यांनी केला. पुण्यात मगरपट्टा सिटीच्या शेजारी असलेल्या एका नवीन इमारतीत ड्रायव्हरच्या नावावर एक अख्खा मजलाच आहे. हे पैसे कुणाचे आहेत? जैन मल्टीस्टेटच्या मालमत्तांमध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि वाल्मीक कराड यांची नावे आहेत. वाल्मीक कराडच्या नावाने 100 बँक खाती असून त्यात हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याचा दावाही आमदार धस यांनी केला. त्याचबरोबर सातपुडा बंगल्यावर झालेल्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते, असेही ते म्हणाले. या प्रकरणातले आरोपी नितीन बिक्कडनेच पळवले, त्याने त्यांना मदतही केल्याचा आरोप त्यांनी केला.

डिलीट केलेला व्हिडीओ मिळाला

संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेल्या गाडीत दोन मोबाईल आढळले होते. त्याचबरोबर अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मोबाईलही पह्रेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या मोबाईलमधील सर्व डेटा आरोपींनी डिलीट केला होता. मात्र पह्रेन्सिक तंत्रज्ञांनी महप्रयासाने हा डेटा परत मिळवला. त्यामध्येच संतोष देशमुख यांना अमानवी पद्धतीने मारहाण करतानाचा व्हिडिओही सापडला. मारहाण करताना आरोपी त्याचा आनंद घेत असल्याचे या व्हिडिओत दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कृष्णा आंधळे कुठे आहे?

पैसे संपल्यानंतर सुदर्शन घुले याने एका निकटवर्तीयाशी संपर्क केला. त्याने पैसे देण्याचे कबूल केल्यानंतर कृष्णा आंधळेला पैसे घेण्यासाठी मंदिराबाहेर पाठवण्यात आले. पैसे घेण्यासाठी बाहेर पडलेला कृष्णा परत आलाच नाही. त्यामुळे सुदर्शन आणि सुधीर कसेबसे पुण्यात आले. कृष्णाचा मात्र अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही.

अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यात हवापाण्यावर चर्चा

संतोष देशमुख प्रकरणात राजीनाम्याची मागणी होत असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक भेट घेतली. दोघांमध्ये सव्वा तास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपण नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होते. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या तीन बैठका झाल्या असून त्याची माहिती मी अजितदादांना दिली. राजीनाम्यावर आमची कोणतीही चर्चा झाली नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.