वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली

संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येप्रकरणी संशयित आणि खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याची संपूर्ण संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीच्या हालचाली वाढल्या आहेत. नुकताच त्यांनी न्यायालयाला परवानगीसाठी अर्ज दिला आहे.

वाल्मीक कराड हा सध्या खंडणी आणि मकोका अंतर्गत न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने प्रचंड संपत्ती गोळा केली आहे. घरगडी ते कोट्यवधी रुपयांचा मालक कसा झाला याचा शोध युद्धपातळीवर घेण्याचे काम सुरू आहे.

वाल्मीक कराड याने दोन्ही पत्नींच्या नावावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. पुण्यात अनेक फ्लॅट आणि शॉपिंग सेंटरमधील दुकाने घेतली आहेत. त्यातच अजून संपत्ती उघड व्हायची आहे. वाल्मीक कराडची संपत्ती हजार कोटींच्या घरात असल्याची शक्यता आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे. एसआयटीने वाल्मीक कराड, त्याच्या दोन पत्नी, मुलगा, ड्रायव्हर, वॉचमन, विष्णू चाटे, मावस बहीण आणि इतर नातेवाईकांच्या नावावर असणाऱ्या संपत्तीची माहिती गोळा केली आहे. ही संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यासाठी एसआयटीने नुकताच न्यायालयाला अर्ज देऊन संपत्ती सील करण्याची परवानगी मागितली आहे.