Prajwal Revanna arrest : प्रज्ज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावरून अटक; आजच कोर्टात हजर केले जाणार

कर्नाटकमधील सेक्स स्कँडल आणि लैंगिक शोषणाचे आरोप असणारा जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्ज्वल रेवन्ना 35 दिवसांनी मायदेशी परतला आहे. जर्मनीहून बंगळुरूत येताच एसआयटीने त्याला अटक केली आहे. आजच त्याला न्यायालयासमोर हजर केले जाईल. लैंगिक शोषणाचे शेकडो व्हिडीओ समोर आल्यानंतर 27 एप्रिल रोजी तो जर्मनीला पळाला होता.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रज्ज्वल रेवन्ना याचे शेकडो अश्लील व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. याची चाहूल लागताच प्रज्ज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेला होता. मात्र गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो मायदेशी परतला. बंगळुरू विमानतळावर उतरताय एसआयटीने त्याला अटक केली. अटकेनंतर महिला पोलिसांच्या पथकाच्या जीपमधून सीआयडी ऑफिसमध्ये नेण्यात आले. रात्रभर त्याला सीआयडी ऑफिसमध्ये ठेवण्यात आले.

प्रज्ज्वल रेवन्ना याला शुक्रवारी वैद्यकीय चाचणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात येईल. त्याला 24 तासांमध्ये न्यायदंडाधीकाऱ्यांसमोर हजर करावे लागणार आहे. येथे पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करतील. एसआयटी प्रज्ज्वल रेवन्ना याला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, फॉरेन्सिक पथकही प्रज्ज्वल रेवन्ना याची चौकशी करणार आहे. त्याच्या आवाजाचे सँपल घेतले जाईल. याद्वारे व्हायरल व्हिडीओतील आवाज त्याचा आहे अथवा नाही हे देखील स्पष्ट होईल.

व्हिडीओ केला होता जारी

प्रज्ज्वल रेवन्ना याने व्हिडीओद्वारे एक निवेदन जारी करत आपल्या पालकांची माफी मागितली होती. तसेच माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. त्यामुळे मी मानसिक तणावाखाली होतो. मात्र, आता 31 मे रोजी सकाळी आपण तपास यंत्रणांसमोर हजर राहून चौकशीला सहकार्य करेन. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझ्याविरोधात खोटा आरोप केला जात आहे. तपासातून सर्व सत्य समोर येईल. कायद्यावर माझा भरवसा आहे, असेही त्याने व्हिडीओमध्ये म्हटले होते. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री तो बंगळुरू विमानतळावर दाखल झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तत्पूर्वी 27 मे रोजी त्याने अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र आता त्याला अटक करण्यात आल्याने तांत्रिकदृष्ट्या ही याचिका जामीन अर्ज झाला आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होईल.