क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घालत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘बॅगी ग्रीन कॅप’चा लीलाव ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे 3 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडला. या लिलाव प्रक्रियेत ही कॅप 2.63 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली.
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये क्रिकेटच्या इतिहासातील दुर्मिळ वस्तूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेसाठी डॉन ब्रॅडमन यांच्या ‘बॅगी ग्रीन कॅप’चा सुद्धा लिलाव पार पडला. यावेळी ऑक्शन हाऊस ‘बोनहम्स’ ने सांगितले की, डॉन ब्रॅडमन यांनी 1947-48 साली जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आली होती, तेव्हा त्यांनी ब्रॅडमन यांनी ही कॅप घातली होती. जवळपास 80 वर्ष जुनी ही कॅप आहे. ही मालिका डॉन ब्रॅडमन यांची घरच्या मैदानावरील शेवटची कसोटी मालिका होती. या कसोटी मालिकेत ब्रॅडमन यांनी टीम इंडियाविरुद्ध 6 डावांमध्ये 178.75 च्या सरासरीने 715 धावा चोपून काढल्या होत्या. यामध्ये तीन शतके आणि एक द्विशतकाचा समावेश आहे. तसेच ही मालिका ऑस्ट्रेलियाने 4-0 अशा फरकाने जिंकली होती.
हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा होती. त्यावेळी डॉन ब्रॅडमन यांनी ही कॅप टीम इंडियाचे मॅनेजर पंकज गुप्ता यांना दिली होती. पंकज गुप्ता यांनी ही कॅप टीम इंडियाचे यष्टीरक्षक पीके सेन यांनी भेट स्वरुपात दिली होती. त्यानंतर 2010 साली ब्रॅडमन यांची ही कॅप उधार स्वरुपात बोरल येथील ब्रॅडमन संग्रहायलामध्ये देण्यात आली होती. ऑक्शन हाऊस बोनहम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जी व्यक्ती या कॅपची मालक आहे, त्यांनी 2003 साली ही कॅप खरेदी केली होती. ब्रॅडमन यांनी 1948 साली इंग्लंडविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ओव्हलमध्ये खेळला होता. डॉन ब्रॅडमन यांचे निधन वयाच्या 92 व्या वर्षी 2001 साली झाले.