>>राजेश चुरी, मुंबई
मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदार असलेल्या सायन-कोळीवाडा मतदारसंघाचे स्वरूप दिवसेंदिवस बकाल होत चालले आहे. जीटीबी नगर, पंजाबी कॉलनी, प्रतीक्षानगर, अॅण्टॉप हिल, बरकत अली नाका, जैन सोसायटी, वडाळा ट्रक टर्मिनस असा विभाग असलेल्या मतदारसंघात पायाभूत सुविधांची वानवा आहे. असंख्य समस्यांच्या विळख्यात अडकलेले मतदार या भागाचा विकास कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मतदारांना बदल घडवण्याची संधी चालून आलेली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे गणेश कुमार यादव, भाजपचे पॅप्टन आर. तमिल सेल्वन, मनसेचे संजय भोगले, बसपाचे विलास कांबळे असे एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपचे तमिल सेल्वन हे मागील दहा वर्षे आमदार आहेत, पण या विभागाचा विकास करण्यात स्थानिक आमदार असमर्थ ठरल्याचे या विभागातील मतदार सांगतात. रखडलेला पुनर्विकास, रस्त्यांची दुर्दशा, खड्डे, पाण्याची समस्या, विजेचा अपुरा पुरवठा या समस्यांचा मतदारांना वर्षानुवर्षे सामना करावा लागत असल्याचे मतदार सांगतात. किंबहुना, मागील दहा वर्षांत मतदारसंघाची दुर्दशा झाली आहे. या भागात किमान 20 ते 25 झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प रखडलेले आहेत. बिल्डरने पुनर्विकासाच्या नावाखाली प्रकल्प हाती घेतले, पण पुढे नेलेच नाहीत. गणेश नगर, शिवशंकर नगर परिसरात झोपडपट्टय़ा तशाच आहेत. शीव कोळीवाडा हौसिंग सोसायटी, आकार हौसिंग सोसायटी रखडले आहेत. आकार हौसिंग सोसायटीतील साडेसातशे ते आठशे झोपडय़ा रहिवाशांनी खाली केल्या. रहिवासी अन्यत्र स्थलांतरित झाले. जागेचे भाडेही मिळत नाही. गांधी मार्पेटसमोरील सुंदर कमला नगरची अवस्थाही तशीच आहे. बिल्डर जागा रिकाम्या करतो आणि मग प्रकल्प दुसऱ्याच्या ताब्यात देतो. ‘सेलेबल’च्या जागा विकून टाकतात, पण मूळ झोपडपट्टीवासीयांची घरे पूर्ण होत नाहीत अशी तक्रार आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा मोठा फटका सत्ताधारी पक्षाला बसणार आहे. पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे मतदारांची प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेक ठिकाणी पाण्याची बेकायदा कनेक्शन दिल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे उमेदवार गणेश कुमार यादव यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला तरी ते मतदारांशी सतत संपर्कात राहिले आहेत. स्थानिकांची अनेक कामे केली आहेत. त्याचा मोठा फायदा होणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे संघटन आणि ताकद मजबूत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनिल देसाई यांना सुमारे 9 हजार 312 मतांचे लिड मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत शिवसैनिक अत्यंत मजबुतीने प्रचार करीत आहेत. शिवसैनिकांच्या सोबतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत नाराजीचा मोठा फटका तमिल सेल्वन यांना बसणार आहे. कारण भाजपचे प्रसाद लाड तसेच माजी नगरसेविका राजश्री शिरवाडकर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, पण तमिल सेल्वन यांना उमेदवारी मिळाली आहे.
या मतदारसंघाला राज्य सरकारच्या फंडातून 60 कोटी आणि पालिकेचे 40 कोटी असा 100 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे सांगण्यात येते. कोट्यवधींचा निधी मिळूनही रंगरंगोटीच्या पलीकडे काही कामे होताना दिसत नाही असे स्थानिक रहिवासी सांगतात. सत्तेत असूनही निधीचा विनियोग लावला नाही.