सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मिळकती सील, 345 कोटींची थकबाकी

महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या वडगाव येथील 43 आणि कोंढवा बुद्रुक येथील सहा मिळकती सील केल्या आहेत. या संस्थेच्या शहरात एकूण 128 मिळकती असून, त्यांची 345 कोटी रुपये इतकी मिळकतकराची थकबाकी आहे.

महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या मिळकतींवर कारवाई करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. डिसेंबर महिन्यात महापालिकेने एरंडवणे येथील मिळकतीच्या कार्यालयास सील ठोकले होते. सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थेच्या वडगाव बुद्रुक येथे 43 मिळकती आहेत. या मिळकतींची एकूण 198 कोटी 61 लाख रुपये इतकी थकबाकी आहे. या थकबाकीपोटी या मिळकतींचे कार्यालय सील करण्यात आले आहे. तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थेच्या एरंडवणे येथील मिळकतीची 4७ कोटी 43 लाख रुपये इतकी थकबाकी आहे, तर कोंढवा बुद्रुक येथील सहा मिळकतींची 20 कोटी 50 लाख रुपये इतकी थकबाकी आहे. या मिळकतींची थकबाकी भरली गेली नाही तर त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या संस्थेच्या 128 मिळकतींची एकूण थकबाकी 345 कोटी रुपये इतकी आहे. मंगळवारी कारवाई करण्यात आलेल्या 48 मिळकतींची एकूण थकबाकी 270 कोटी इतकी असल्याची माहिती मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. दरम्यान, एरंडवणे येथील मिळकतीची 2009 सालापासून थकबाकी आहे, तर वडगाव बुद्रुक येथील मिळकतीची 2002 आणि कोंढवा बुद्रुक येथील मिळकतीची 2008 सालापासून थकबाकी आहे. महापालिकेचा करआकारणी व कर संकलन विभाग आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या मिळकतकरावरून न्यायालयीन वाद सुरू आहे.

मालमत्ता थेट सील केल्या जात नाहीत, तर त्यांच्या मुख्य कार्यालयांना सील ठोकले जाते. शाळा-कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाते. – माधव जगताप, प्रमुख, मिळकत करआकारणी विभाग

थकबाकीदार शासकीय संस्थांवर कारवाई नाही
शहरातील एकूण 438 शासकीय मिळकतींची 93.24 कोटी इतकी थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी शासकीय मिळकतधारकांकडे केवळ पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तसेच शहरातील टॉप-100 थकबाकीदार मिळकतधारकांची 334.10 कोटी इतकी थकबाकी आहे. फुरसुंगीचे संतोष काटेवाल यांची सर्वाधिक 18 कोटी 44 लाख 3७ हजार 585 रुपये इतकी थकबाकी आहे