मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये शिवसैनिकांची धरपकड, जिल्हाप्रमुख नजरकैदेत

नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये 2026-27 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या 23 मार्च रोजी नाशिकमध्ये येत आहे. यावेळी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची ते चर्चा करणार आहे. मात्र याच वेळी सरकारने गेल्या दीड वर्षात कोणती विकास कामे केली, असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केले. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांना नजरकैदेत ठेवले आहे. शिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही, याची लिखित हमी पोलिसांकडून घेतली जात असल्याने शिवसैनिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांचा शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वच मान्यवरांकडून सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर जोरदार टीका करण्यात आली. तर सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या एकजुटीने शिवसेनेला पुनर्वैभव प्राप्त होईल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवीन, असा विश्वास नवनियुक्त जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

जिल्हा व शहरातील अनेकजण पक्ष सोडून गेले असले तरी मूळ शिवसेना जागेवर आहे. निष्ठावंत शिवसैनिक प्रामाणिकपणे संघटनावाढीसाठी काम करीत आहेत, असे ते म्हणाले. तर शहर व जिह्यात पक्षबांधणीसाठी प्रभागात, गट-गणात भेटी द्या, बैठका घेऊन चर्चा करा आदी सूचना उपनेते सुधाकर बडगुजर यांनी दिल्या. पक्षहितासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शिवसैनिकांच्या जिद्दीने शहर व जिह्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण होईल, असे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितले. आगामी निवडणुकांना एकजुटीने सामोरे जाऊ, असे माजी आमदार वसंत गीते, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी स्पष्ट केले. जिल्हाभर शिवसेनेची मशाल तेजाने झळकण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील राहू, असे खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वत्र शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी व्यक्त केला.