सात वर्षांत एकच साक्ष; हायकोर्टाने मंजूर केला आरोपीला जामीन

रेंगाळलेल्या हत्येच्या खटल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. सुखदेव रामदास मडवी असे या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 2017 मध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली व त्याचा खटलाही सुरू झाला.

सात वर्षांपासून खटला प्रलंबित असल्याने मडवीने जामिनासाठी याचिका केली. न्या. अनिल किलोर यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

मडवीविरोधातील खटल्यात एकूण 39 साक्षीदार आहेत. गेल्या सात वर्षांत यातील केवळ एकाच साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली आहे. भविष्यात हा खटला कधी संपेल याची शाश्वती नाही, असे नमूद करत न्या. किलोर यांनी मडवीला 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

हा खटला संपेपर्यंत मडवीने पुण्यात जाऊ नये. केवळ दैनंदिन सुनावणीसाठी त्याने पुण्यात जावे, पुराव्यांशी छेडछाड करू नये, महिन्याच्या पहिल्या तारखेला फरासखाना पोलीस ठाण्यात त्याने हजेरी लावावी, अशा अटी न्यायालयाने मडवीला घातल्या आहेत. यातील एकाही अटीचे मडवीने उल्लंघन केले तर पोलीस त्याचा जामीन रद्द करण्यासाठी स्थानिक न्यायालयात अर्ज करू शकतात, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा दाखला

आरोपी अनेक वर्षे कारागृहात असेल व खटला पूर्ण होण्याची काहीच आशा नसेल तर आरोपी जामिनास पात्र आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे. मडवीला जामीन मंजूर करताना न्या. किलोर यांनी या निकालाचा संदर्भ नमूद केला.