बिहारच्या सिंघमचा राजीनामा

मूळचे अकोल्याचे मराठमोळे डॅशिंग आणि बिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा, भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या अचानक राजीनामा देण्याने बिहार, महाराष्ट्रच नाही, तर देशभरात चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवदीप लांडे यांच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबतची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असून यापुढे बिहारमध्येच राहाणार असून हीच माझी कर्मभूमी असेल असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुढील वर्षी बिहारमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे ते निवडणूक लढवणार का, अशी चर्चाही सुरू आहे.

गेली 18 वर्षे शासकीय पदावर काम केल्यानंतर आज मी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षांत मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबाहून अधिक मानले. माझ्या सेवेत काही चूक झाली असेल तर माफ करा. मी यापुढे बिहारमध्येच राहणार, असे शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे.