मणिपूरपेक्षा अंबानीच्या मुलाचं लग्न महत्त्वाचं आहे का? प्रसिद्ध गायिकेचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल

देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट शनिवारी विवाहबद्ध झाले. या शाही लग्नसोहळ्याला राजकीय, क्रीडा, सिनेसृष्टीतील बड्या लोकांनी हजेरी लावली. तसेच देश-विदेशातील अनेक दिग्गजही दोघांना आशीर्वाद देण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबई दौऱ्यातून वेळात वेळ काढून या लग्नाला उपस्थिती दर्शवत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. यावरून प्रसिद्ध गायिका नेहा सिंह राठोड हिने मोदींवर निशाणा साधला आहे.

नेहा सिंह राठोड हिने मणिपूरचा उल्लेख करत पंतप्रधान नरेद्र मोदी यांना बोचरा सवाल केला आहे. मणिपूरपेक्षा अंबानीच्या मुलाचं लग्न जास्त महत्त्वाचं आहे का? तुम्ही मणिपूरला का जात नाहीत? असे सवाल नेहा हिने मोदींना केले आहेत. यासोबत तिने मोदींचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. यात ते अंबानीच्या लग्ना अनंत व राधिया या जोडप्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत.

मणिपूर गेल्या दीड वर्षापासून हिंसेच्या आगीत धुमसत आहे. दोन समाजात भडकलेल्या हिंसाचारात यातापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना पलायन करावे लागले आहे. मणिपूरमध्ये भाजपचेच सरकार असून गेल्या दीड वर्षात पंतप्रधानच नाही तर देशाचा एकही बडा नेता तिकडे फिरकलेलाही नाही. यावरून विरोधकांनीही त्यांच्यावर निशाणा साधला.

नुकतेच काँग्रेस खासदार आणि लोकसेती विरोधी पक्षनेते राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधींच्या या दौऱ्यावेळीही नेहा सिंह राठोड हिने मोदींवर हल्ला चढवला होता. देशाच्या लोकांना निराधार सोडून तुम्ही 18-18 तास काय करता? असा सवाल तिने केला होता.