
सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील तिच्या स्वतःच्याच कार्यक्रमात तीन तास उशिरा पोहोचल्यानंतर सर्व रसिक श्रोत्यांची माफी मागितली. मात्र, नेहाने माफी मागूनही रसिकांचा रोष कायम होता. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नेहाने माफी मागूनही रसिकांनी तिचे काही ऐकून न घेता आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
माफी मागताना नेहा कक्करला अक्षरक्षः अश्रू अनावर झाले. तिने रसिकांना उद्देशून म्हटले की, मी मनापासून तुमची माफी मागते. मी आयुष्यात कधीही कोणालाही एवढी वाट पाहायला लावली नाही. हे मला आवडत नाही. तुम्ही वाट पाहत आहात याबद्दल जाणून मला फार वाईट वाटले. ही संध्याकाळ माझ्या नेहमीच आठवणीत राहील. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप वेळ काढला आहे. त्यामुळे मी तुमचे अधिक मनोरंजन करेन याची खात्री देते. नेहाच्या या कृतीनंतर काहींनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांनी याबद्दल निराशा व्यक्त केली.