
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एसटी कमर्चाऱ्यांच्या प्रश्नांबाबत बुधवारी (09-04-2025) कुडाळ एसटी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, राज्य सरकार आणि एसटी महामंडळाकडून कुडाळ एसटी आगारासाठी एकही नवीन एसटी देण्यात आली नाही, याबाबत वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापक यांना जाब विचारला. कुडाळ सारख्या महत्वाच्या आगारासाठी नवीन एसटी गाड्या मिळाल्याच पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी 10 नवीन एसटी गाड्या मिळण्याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्याची ग्वाही आगार व्यवस्थापकांनी दिली. त्याचबरोबर इन्सुली घाटात झालेल्या एसटी अपघातात प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या एसटी चालकालाच दोषी धरण्यात आले आहे. याबाबतही वैभव नाईक यांनी संतप्त होत आगार व्यवस्थापकांना जाब विचारला. नादुरुस्त गाड्या देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालताय आणि त्याचे खापर चालकावर फोडताय, हे चुकीचे असल्याचे सांगत याबाबत परिवहन मंत्री आणि विभाग नियंत्रक यांचे लक्ष वेधणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, अतुल बंगे, पपू म्हाडेश्वर, कामगार सेनेचे जिल्हा सचिव आबा धुरी उपस्थित होते.