
नवी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने गंभीर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार सूर्यकुमार पांडे याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वाराच्या मागे बसलेला अंनिस शर्मा हा जखमी झाला. हा अपघात महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडी उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीत कामाला असणारे सूर्यकुमार पांडे व अंनिस शर्मा हे शुक्रवारी रात्री नवी मुंबईहून गोव्याला पर्यटनासाठी दुचाकीवरून जात होते. शनिवारी सकाळी महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडी येथील उड्डाणपुलाजवळ आले असता दुचाकीस्वार सूर्यकुमार पांडे याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी उड्डाणपुलासाईटला असलेल्या संरक्षक कठड्याला जावून आढळली. या धडकेत सूर्यकुमार पांडे याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अंनिस शर्मा हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी मदतकार्य करत रुग्णवाहिकेतून जखमी अंनिस शर्मा याला कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर सूर्यकुमार पांडे याचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला आहे.