
देवगड तालुक्यातील तिर्लोट-आंबेरी पुलावरून दोन लहान मुलांसह मातेने खाडीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीशा सुरज भाबल (24), श्रेयश (5) व दुर्वेश (4) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना 17 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. पतीशी झालेल्या किरकोळ वादातून श्रीशाने मुलांसमवेत आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या घटनेने देवगड तालुका हादरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिर्लोट-आंबेरी येथील सुरज सुहास भाबल यांच्याशी श्रीशा हिचा 22 जून 2028 रोजी विवाह झाला. श्रीशाचे माहेर कर्नाटक रायचूर येथील असून ती आई वडिलांसमवेत कल्याण येथे राहत होती. तिचे पती सुरज भाबल हे नोकरीनिमित्त मुंबई दादर येथे राहत असून रेल्वेमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली होती. श्रीशा ही तिचे मुलगे श्रेयश व दुर्वेश यांच्यासमवेत सासरी तिर्लोट आंबेरी येथे सासरे सुहास शिवराम भाबल, सासू सुहासिनी, दीर मिलींद यांच्यासमवेत राहत होती. 15 एप्रिल रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास श्रीशा हिने आपल्या पतीशी फोनवरून मुंबईला घेवून जाण्यासंदर्भात विचारणा केली. परंतू पती सुरज याने मुंबई येथे राहण्याची व्यवस्था नसल्याचे सांगत मुंबईला घेवून जाण्याबाबत नकार दिला. यावेळी रागाने श्रीशाने सासू व सासरे यांना न सांगता त्याच सायंकाळी 4.45 वा. दोन्ही लहान मुलांना घेवून घरातून निघून गेली आणि परत घरी आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास आंबेरी जेटीजवळ श्रीशाचा मृतदेह आढळून आला. तसेच तेथीलच पिराचे पोय याठिकाणी श्रेयशचा मृतदेह सापडला. तर दुर्वेशचा मृतदेह 17 एप्रिल रोजी दुपारी आंबेरी खाडीपात्रातच कातळी किनारी सापडला.
घटनेची माहिती श्रीशाचे सासरे सुहास भाबल यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली. देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी घनःश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण, पोलीस हवालदार प्रशांत जाधव, सुनिल पडेलकर, पो. कॉ. बाबाजी कांदे, प्रशांत गावडे, महिला पोलीस वनिता पडवळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी तेथील रामकृष्ण जुवाटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष कुलदीप लिंगायत, पोलीस पाटील अमित घाडी उपस्थित होते. विजयदुर्ग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.