Sindhudurg News – आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरकमहोत्सवानिमित्त नाटके व एकांकिकांची मेजवानी

आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांचा यावर्षी हिरक महोत्सव साजरा होत असून यानिमित्त मंडळातर्फे निर्मित दोन नाटके सादर होणार असून दि.28 फेब्रुवारी रोजी एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त आंगणेवाडी नाट्यमंडळ मुंबई यांच्या वतीने दरवर्षी नाटके सादर करण्यात येतात. यावर्षी या मंडळाला 60 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त भराडी देवीच्या यात्रोत्सवानंतर श्री देवी भराडी रंगमंच, आंगणेवाडी येथे मंडळातर्फे प्रस्तुत दोन नाटके सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये दि. 25 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता आंगणे कुटुंबीय निर्मित आणि मधुसूदन कालेलकर लिखित महेश सावंत (पटेल) दिग्दर्शीत ‘डार्लिंग, डार्लिंग’ हे दोन अंकी विनोद नाटक सादर होणार आहे. तर दि. 27 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा. आंगणे कुटुंबीय निर्मित, सुरेश खरे लिखित व महेश सावंत (पटेल) दिग्दर्शीत ‘कुणी तरी आहे तिथं’ हे हॉरर नाटक सादर होणार आहे.

आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरकमहोत्सवानिमित्त 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून एकांकिका महोत्सव होणार आहे. यामध्ये कलांश थिएटर प्रस्तुत ‘क्रॅक्स इन थिएटर’, एकदम कडक नाट्यसंस्था भाईंदर प्रस्तुत ‘पाटी’, जिराफ थिएटर प्रस्तुत ‘गुडबाय किस’, कलादर्शन पुणे प्रस्तुत ‘बॉईल्ड शुद्ध शाकाहारी’, गायन समाज देवल क्लब कोल्हापूर प्रस्तुत ‘ऑलमोस्ट डेड’ या एकांकिका सादर होणार आहेत. तरी नाट्यरसिकानी उपस्थित राहावे, असे आवाहन आंगणे कुटुंबीय व आंगणेवाडी नाट्यमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.