बीडपेक्षा सिंधुदुर्गची अवस्था भयानक; तरुणाला नग्न करत मारहाण करून केली हत्या; सिद्धेश शिरसाटचा आका कोण?

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्याचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. आता अशीच एक संतापजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात उघडकीस आली आहे. कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर (वय 35) याचे दोन वर्षापूर्वी अपहरणानंतर मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिडवलकर यांना आधी नग्न करून त्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला. यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिंदे गटाचे सिद्धेश शिरसाटसह 3 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सिद्धेश शिरसाटचा आका कोण?

यातच बिडवलकर यांची निर्घृण हत्या करणाऱ्या सिद्धेश शिरसाटचा आका कोण आहे, असा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, “बीड जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली असून कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. कुडाळमधील बिडवलकर नावाच्या तरुणाला नग्न करून फक्त 22,000 द्यायचे होते, म्हणून शिंदेसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नग्न करून मारहाण केली. ज्यात त्याचा मृत्यू झाला.”

वैभव नाईक म्हणाले की, “सिद्धेश शिरसाट याचे शिंदे गटाच्या अनेक लोकांशी संबंध आहे. त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले आहेत. त्यामुळे या सिद्धेश शिरसाटचा खरा आका कोण? हा प्रश्न सिंधुदुर्गवासीयांना पडला आहे. पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे. तसेच जे कोणी या तपासात दबाव निर्माण करत आहेत, त्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत.”

काय आहे प्रकरण?

दरम्यान, कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याचे अपहरण करून त्याला केलेल्या मारहाणीत प्रकाशचा मृत्यू झाला. त्यांनतर त्याचा मृतदेह कुडाळ वरुन सातार्डा येथे नेऊन जाळण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 2023 मध्ये दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या खूनप्रकरणी निवती पोलिसांनी सिद्धेश अशोक शिरसाट (44, रा. कुडाळ), गणेश कृष्णा नार्वेकर (33, रा. माणगाव), सर्वेश भास्कर केरकर (29, रा. सातार्डा, ता. सावंतवाडी) आणि अमोल उर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट (रा. पिंगुळी, ता. कुडाळ) या चौघांना अटक केली होती. सुरुवातीला त्यांना कुडाळ न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपताच त्यांना रविवारी 13 एप्रिल रोजी कुडाळ न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने चार पैकी सिद्धेश शिरसाटसह 3 संशयित आरोपींची पोलीस कोठडीची मुदत 15 एप्रिल पर्यंत वाढवून दिली तर चौथा संशयित अमोल शिरसाट याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

परंतु संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश अशोक शिरसाट याची प्रकृती बिघडल्याने त्याची पोलीस कोठडी अबाधित ठेवून त्याच्यावर वैद्यकीय उपचार होण्यासाठी न्यायालययीन कोठडी देण्याची मागणी कुडाळ पोलिसांनी केली. त्या प्रमाणे सिद्धेश शिरसाट यास तात्पुरती न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.सध्या तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची तब्बेत सुधारली कि पोलीस त्याला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणात दोन वाहनांचा वापर झाला होता. त्या पैकी प्रकाश बिडवलकर याला मारहाण करून त्याचा मृतदेह कुडाळ वरून चेंदवण येथे नेण्यासाठी संशयितांनी ज्या वाहनाचा वापर केला ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर कुडाळ ते सातार्डा पर्यंत मृतदेह ज्या गाडीतून नेला ती गाडी अद्याप उपलब्ध झाली नाही. सिध्देश शिरसाट पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच कोल्हापूर येथे गेला होता, ज्यावेळी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने आपला मोबाईल सोबत घेतला नाही,तर तो मोबाईल आपल्या नातेवाईकांकडे दिला आहे,तो हस्तगत करायचा आहे अशी महिती तापसिक अंमलदार भीमसेन गायकवाड यांनी दिली. प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात आता अजून धागेदोरे पोलीस तपासात हाती येत आहेत. यात आणखी काही व्यक्ती सहभागी आहेत का? त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.