मिंधे सरकारच्या नाकर्तेपणाचा बळी; पूल नसल्याने वैतरणा नदीत दोघे वाहून गेले

कोट्यवधींच्या फसव्या योजनांचे बुडबुडे सोडणाऱ्या मिंधे सरकारचा नाकर्तेपणा मोखाडावासीयांच्या जीवावर बेतत आहे. आश्वासन देऊनही वैतरणा नदीवर पूल न बांधल्याने दोघे जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना सावर्डे गावाजवळ घडली आहे. मात्र त्याचवेळी काही जागरूक नागरिकांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत उडी मारून वाहून जाणाऱ्या अकरा वर्षीय मुलीला वाचवले. परंतु भास्कर पादीर यांचा दोन दिवसांनंतरही शोध लागला नसून एनडीआरएफची टीम घटनास्थळावर दाखल होणार आहे. दरम्यान या नदीवर पूल बांधावा यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन कानाडोळा करत असल्याने सावर्डेवासीयांनी संताप व्यक्त केला आहे.

किती बळी गेल्यानंतर जाग येणार?

गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी नदीच्या प्रवाहात सर्च ऑपरेशन राबवले. मात्र भास्कर पादीर यांचा शोध लागला नाही. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान या नदीवर पूल बांधावा यासाठी परिसरातील गावकरी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु राजकारणात मश्गूल असलेल्या सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने अजून किती बळी गेल्यावर सत्ताधारी व प्रशासनाला जाग येईल, असा संतप्त सवाल मोखाडावासीयांनी विचारला आहे.

वैतरणा नदी मोखाडा आणि शहापूर तालुक्यातून वाहते. सावर्डे येथील नागरिकांना शहापूर गाठण्यासाठी याच नदीतून ये-जा करावी लागते. उन्हाळ्यात पाणी कमी असल्याने हा प्रवास सोपा असला तरी पावसाळ्यात मात्र जीवमुठीत घेऊन दुथडी वाहणाऱ्या नदीतून नागरिकांना जावे लागते. 7 सप्टेंबर रोजी शहापूर येथून नेहमीप्रमाणे काही ग्रामस्थ या नदीचे पात्र ओलांडून सावर्डे येथे येत होते. यावेळी भास्कर पादीर (45) यांनी पाणी जास्त असल्याने रुचिता पवार (11) हिला आपल्या खांद्यावर घेतले. मात्र पात्राच्या मध्यभागी जाताच अचानक पाण्याचा लोंढा वाढला आणि दोघेही वाहून जाऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या सोबत असलेल्या अन्य ग्रामस्थांनी पुन्हा पाण्यात उड्या मारून रुचिताला वाचवले. परंतु भास्कर यांचा शोध लागला नाही.

गद्दारीतून सत्तेवर आलेल्या खोकेबाजांनी काही केले नाही

वर्षानुवर्षे सावर्डेवासीयांना जीवमुठीत घेऊन नदीच्या प्रवाहातून ये-जा करावी लागत होती. याबाबत दैनिक ‘सामना’ने 31 जानेवारी 2022 मध्ये ‘मोखाड्यातील ग्रामस्थांचा ओंडक्यावरून जीवघेणा प्रवास’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची गंभीर दखल तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. इतकेच नाही तर दुसऱ्याच दिवशी याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात लोखंडी पूल उभारण्यासाठी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. हा पूल महिनाभरात उभा राहिल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान तत्कालीन सरकारने या भागातील ग्रामस्थांसाठी वैतरणा नदीवर मोठा व मजबूत पूल उभारण्यासाठी आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाने घटनास्थळावर धाव घेत सर्वेक्षण करून जवळपास दोन कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला. परंतु काही महिन्यांतच गद्दारीतून सत्तेवर आलेल्या मिंधे व भाजपने याकडे कानाडोळा केल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे, असा आरोप मोखाडावासीयांनी केला आहे.