निवडणुकांमुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी, 15 नोव्हेंबरपासून गाळप हंगामाला सुरुवात; निवडणुकांमुळे जादा दर मिळण्याची शक्यता

राज्यातील ऊसगळीत हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. सोबतच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून, प्रशासकीय आणि राजकीय पक्षांच्या पातळीवर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, 15 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू होणार असून, याचदरम्यान विधानसभा निवडणुका होणार असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळणार आहे. यामुळे राज्यातील सामान्य मतदारांप्रमाणे ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करणाऱ्यांना यंदाच्या विधानसभेत मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे.

नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विशेष करून पुणे, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी विधानसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय ऊसदराची घोषणा होईल, या आशेवर शेतकरी बसला आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे यंदा ऊस कमी असून, कारखानेही एक महिना उशिरा सुरू होत आहेत. त्यामुळे उसाची रिकव्हरी किमान एक टक्क्यापर्यंत वाढणार आहे. गेल्या वर्षीचा हंगाम 20 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता. यंदा सुरू असलेला पाऊस आणि विधानसभा निवडणूक यामुळे यंदाचा हंगाम जवळपास एक महिना उशिरा म्हणजे 15 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. एक महिना उशीर झाल्याने उसाची रिकव्हरी वाढली, तर 10.15  टक्क्यांपुढील साखर उताऱ्यावर जादाचे पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत.

नगर जिल्ह्यात 23 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे मोठे जाळे आहे. मात्र, यातील किती साखर कारखाने सुरू होणार, यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सध्या गाळप परवाने काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील वर्षीच्या उसाला जिल्ह्यात सर्वाधिक भाव पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रवरा साखर कारखान्याने 3200 जाहीर केला आहे. यामुळे इतर कारखाने अंतिम भाव काय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच आता विधानसभा निवडणूक असल्याने आणि जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांच्या राजकारणात साखर कारखाने राजकीय केंद्रबिंदू असल्याने यंदा ऊसउत्पादकांना जास्तीतजास्त भाव द्यावा लागणार आहे. यातून कारखाना-कारखान्यांत स्पर्धा होऊन याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

गेल्या वर्षी लागवड केलेला ऊस यंदा गाळपासाठी तयार झाला आहे. लागवड कमी झाल्यामुळे गाळपासाठी उसाची उलब्धताही कमी आहे. गेल्या वर्षी सुमारे 59.44 लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. यंदा सुमारे 56,04 लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. उत्तर प्रदेशात 23.32 लाख हेक्टर, महाराष्ट्र 13.10 लाख हेक्टर, कर्नाटक 6.20 लाख हेक्टर, तामीळनाडू 2 लाख हेक्टर, गुजरात 2.31 लाख हेक्टर आणि देशाच्या उर्वरित राज्यात 9.95 लाख हेक्टर असे उसाचे गाळप होणार आहे.

महाराष्ट्रात 102 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

राज्यात यंदा साखर उत्पादनात सुमारे दहा लाखटनांनी घट होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी 110 लाख साखर उत्पादन झाले होते. यंदा 90 ते 102 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी सुमारे सात लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी करण्यात आला होता, तर 110 लाख साखर उत्पादन झाले होते. यंदा 12 लाख टन साखरेचा वापर इथेनॉलनिर्मितीसाठी करण्यात येणार असून, निव्वळ साखर उत्पादन 90 ते 102 लाख टन होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यात यंदा 11.67 लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. सरासरी प्रतिहेक्टर 86 टन उत्पादनाचा अंदाज आहे. लागवड, चारा, गुऱ्हाळघरे आणि रसवंतीसाठी उपयोग होणारा ऊस वगळून एकूण 904 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. सरासरी 11.30 टक्के उतारा मिळून एकूण 102 लाख टन साखर उत्पादन होईल. त्यापैकी 12 लाख टन साखरेचा वापर इथेनॉलसाठी होईल आणि निव्वळ साखर उत्पादन 90 लाख टन होईल. मिटकॉन या संस्थेने 102 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.