
आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात असलेल्या बेस्ट सेवेचे वेस्ट लिस्ट पद्धतीने मोठय़ा प्रमाणात सुरू असलेले कंत्राटीकरण थांबावे, बेस्ट आणि मुंबई महापालिकेमध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे पालन बेस्टची पालक संस्था असलेल्या महापालिकेने करावे, या मागण्यांसह बेस्टची जबाबदारी टाळत असलेल्या मुंबई महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी बेस्ट कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवार, 26 डिसेंबरला बेस्टचे 24 हजार कर्मचारी बेस्टच्या 29 डेपोत काळ्या फिती लावून मूक आंदोलन करणार आहेत. दरम्यान, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. शिवसेनेचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बेस्टच्या आर्थिक स्थितीमुळे बेस्ट कामगार सेनेकडून पालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली होती. मात्र त्या वेळी बेस्टची संपूर्ण जबाबदारी घेण्यास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नकार दिला होता. त्यामुळे आयुक्त, राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आणि खासगीकरणाच्या विरोधात हे आंदोलन केले जाणार आहे.
मुंबई लोकलनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून बेस्ट सेवेकडे पाहिले जाते. बेस्टमधून दररोज 35 लाख प्रवाशी प्रवास करतात. अत्यंत माफक दरात प्रवाशांना बेस्ट सेवा देते. आमचे हे आंदोलन कर्मचाऱ्यांबरोबर प्रवाशांसाठीही आहे. त्यामुळे प्रवाशांनीही या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुहास सामंत यांनी केले.
बेस्ट कामगार सेनेच्या मागण्या
– बेस्टचे कंत्राटीकरण, खासगीकरण थांबवा.
– बेस्टने स्वमालकीच्या 4 हजार बस गाडय़ा खरेदी कराव्यात.
– बेस्टमध्ये कायमस्वरूपी कामगार भरती करा.
– निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी तातडीने द्या.
– प्रलंबित कोविड भत्ता तातडीने द्या.
– पालिका आयुक्तांनी ‘एमओयू’चे पालन करावे!
बेस्ट आणि महापालिकेत सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमाचे पालकत्व मुंबई महापालिकेने घेतले आहे. त्यानुसार जुन्या झालेल्या बेस्ट बसेस टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात येऊन त्या जागी नव्या स्वमालकीच्या बस बेस्टने घेणे बंधनकारक आहे. मात्र जुन्या झालेल्या बस रस्त्यावरून काढून टाकल्या जात आहेत पण त्या जागी नवीन बस घेतल्या जात नाहीत. पंत्राटावर गाडय़ा घेतल्या जात आहेत. पालिका आयुक्तांना हा एमओयू माहीत असतानाही ते आपली जबाबदारी टाळत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी एमओयूचे पालन करावे, अशी मागणी सुहास सामंत यांनी केली आहे.
बस सेवा सुरळीत
गुरुवारी होणाऱ्या आंदोलनात बेस्टचे सुमारे 24 हजार कर्मचारी दंडाला काळ्या फिती बांधून सहभागी होणार आहेत. बेस्टचे चालक, वाहक दंडाला काळ्या फिती बांधून आपली नेहमीची कामे करणार आहेत. त्यामुळे आंदोलनातही बेस्ट सेवा सुरळीत राहणार आहे. दादरच्या वडाळा डेपो येथे सकाळी 11 वाजता मूक निषेध आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्याच वेळी इतर डेपोतही आंदोलनाला सुरुवात होणार आहे.