सूडबुद्धीने निलंबित केलेल्या शिक्षक गिरीश फोंडेंवरील कारवाई मागे घ्या, कोल्हापूर महापालिकेवर शिक्षकांचा मोर्चा मूक मोर्चा

शक्तिपीठ महामार्ग आणि शेतकरी कर्जमाफीवरून घूमजाव केलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांना कोल्हापूर दौऱ्यावर जाब विचारण्यासाठी कुणाल कामराचे गाणे वाजविण्याचा इशारा दिल्याने शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांना राजकीय सूडबुद्धीतून रातोरात महापालिकेच्या शाळेतून सहायक शिक्षक पदावरून निलंबित करण्यात आले होते. हे निलंबन तातडीने मागे घ्यावे यासाठी आज दुपारी शिक्षकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निलंबन रद्द न केल्यास काम बंद करून महापालिकेचे शिक्षक संपावर जातील, असा इशारा देण्यात आला.

इंडिया आघाडी, शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कामगार कृती समिती, दारूबंदी संघर्ष समिती व विद्यार्थी संघटना यांच्या वतीने भवानी मंडप येथून हा मोर्चा काढण्यात आला.

सरकारच्या दडपशाही आणि हुकूमशाहीचा विरोध करत माजी आमदार संपत बापू पाटील यांनी याविरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. या निलंबनाच्या कारवाईमुळे शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, शिक्षक हेदेखील नागरिक आहेत. त्यांना भारतीय संविधान लागू आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यदेखील आहे. आयुक्तांनी मंत्र्यांच्या आदेशावर आंधळा कारभार करणे चालू ठेवल्यास त्यांच्या बदलीची मागणी करू, असे ठणकावून सांगितले.

शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, आज गिरीश फोंडे यांच्यावर कारवाई केली. उद्या कोणी शिक्षक काही बोलला तर हे सरकार त्यांच्यावर कारवाईचा सपाटा लावेल. त्यामुळे निलंबन मागे न घेतल्यास शिक्षक संपावर जातील, असा इशारा त्यांनी दिला. तर महापालिकेतील अधिकारी जनतेच्या प्रश्नासाठी कधी रात्री मीटिंग घेतात काय? पण गिरीश फोंडे यांच्या निलंबनासाठी 3 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता मीटिंग घेतात कशी, असा सवाल काँग्रेसचे सचिन चव्हाण यांनी केला.

‘शक्तिपीठ महामार्ग रद्द करा’, ‘शेती वाचवा, देश वाचवा’, अशा आशयाच्या टोप्या परिधान करून शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. ‘भारतीय संविधान जिंदाबाद’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘दडपशाही व आंदोलकांची मुस्कटदाबी करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत हा मोर्चा महापालिकेवर धडकला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, अनिल लवेकर, भरत रसाळे, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, रघुनाथ कांबळे, कादर मलबारी, प्रभाकर आरडे, सीमा पाटील, बाबासाहेब देवकर यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.